रोहा- नागोठणे राज्यमार्गावर रसायन भररस्त्यात सांडल्याने भीतीचे वातावरण

सुतारवाडी : रोहा - नागोठणे राज्यमार्गावरील भर रस्त्यावर पहाटे दुर्गंधीयुक्त चिकट रसायन सांडल्याने या परिसरातून धाटाव औद्योगिक परिसरात रोजीरोटीवर ये - जा करणार्‍या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

सुतारवाडी : रोहा – नागोठणे राज्यमार्गावरील भर रस्त्यावर पहाटे दुर्गंधीयुक्त चिकट रसायन सांडल्याने या परिसरातून धाटाव औद्योगिक परिसरात रोजीरोटीवर ये – जा करणार्‍या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकाराची रोहा तहसीलदार कार्यालयाकडून गांभिर्याने दखल घ्यावी. भर रस्त्यावर सांडलेले रसायन धाटाव औद्योगिक परिसरातील कोणत्या कारखान्यातील होते, याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी येथील कामगार वर्गातुन होत आहे.

रोह्यातील पांडुरंगशास्त्री आठवले महाद्वार कमानीपासून ते पडम-खारापटपर्यंत भररस्त्यात धाटाव औद्योगिक परिसरामधून वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक वाहनातून हे चिकट दुर्गंधीयुक्त रसायन सांडलेले आहे. हे रसायन चिकट असल्याने रोजीरोटीवर जाणाऱ्या अनेकांच्या दुचाकी घसरुन अपघात झाले आहेत. त्यामुळे त्यांना दुखापत होऊन दुचाकींचेही मोठे नुकसान झालेले आहे. असे समजते की धाटाव औद्योगिक परिसरामधून धोकादायक रसायन घेऊन या मार्गावरुन अनेक मालगाड्या मुंबईकडे ये जा करतात. तरी याबाबतीत पोलीस यंत्रणेसह तहसीलदार कार्यालयाकडून गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
 रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र प्रदूषण पाहताना दिसत आहेत. यावर नेहमीच  वृत्तपत्रातुन आवाज उठविला जातो. राजरोसपणे कधी वायु प्रदुषण, तर कधी जल, भूमी प्रदूषण करीत आहेत. यावर कोणाचेच अंकुश राहीलेले नाही, असे नेहमीच पाहताना दिसत आहे. आज पुन्हा रसायन रस्त्यावर सांडलेले दिसत आहे.
 रोहा नागोठणे राज्यमार्गावर रेल्वेस्टेशन, पिंगळसई, सोनगांव, पडम, खारापटी, सानेगांवकडे अलिबाग पुढे निडी, वरवडे पाले, रेवोली, मेढा, भिसे, राजेवाडी अशी अनेक गावे लागतात. या राज्य मार्गावर नेहमीच कामगार वर्गाची तसेेेच तालुक्याच्या बाजार रहाटीकरिता या परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अलिबाग, नागोठणे, मुंबईकडे ये-जा करणार्‍या मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो, ट्रेलर अशा वाहनांची मोठी वर्दळ असते.  सध्या कोरोना या
संसर्गजन्य आजाराची सर्वांनाच भीती निर्माण झालेली आहे. त्यामधे अशाप्रकारे अपघाताला आमंत्रण देणाऱ्या परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.  या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनीधींसह प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज भासत आहे.