मंगळावर पाणी आहे पण रायगडमध्ये नाही, मंगळावरून इथे पाईपलाईन येणार आहे का ?- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे शैलीतला टोला

मंगळावरच्या पाण्याचा शोध घेतात पण माझ्या रायगडमध्ये, जव्हारमध्ये पाणी नाही. मंगळावरती पाणी आहे..काय शोध लावला. मंगळापासून रायगडापर्यंत(raigad) पाईपलाइन टाकता का? अशा काही विकासाच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या जमिनीवरचा विकास केला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी म्हटले आहे.

    उरण : जग कितीही पुढे गेलो तरी अजून पाण्याची(water) निर्मिती करु शकत नाही. आपण वाट्टेल ते बनवतो पण पिण्याचं पाणी निर्माण करु शकत नाही हे सत्य आहे आणि ते मानायला पाहिजेच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. न्हावा शेवा(nhawa shewa) टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

    “स्वातंत्र्याला आता ७५ वर्ष पूर्ण होत असून आजही जर आपण खेड्यापाड्यात पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलो नसलो तर आपल्या कौतुकाला अर्थ नाही. हे सगळं पाहत असताना मंगळावर पाणी आहे का? याचा शोध सुरु असल्याचे फोटो येतात. हे किती विचित्र आहे. मंगळावरच्या पाण्याचा शोध घेतात पण माझ्या रायगडमध्ये, जव्हारमध्ये पाणी नाही. मंगळावरती पाणी आहे..काय शोध लावला. मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाइन टाकता का? अशा काही विकासाच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या जमिनीवरचा विकास केला पाहिजे. मुंबईला जोडून असणाऱ्या या जिल्ह्यात उद्या लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही तर तो विकास टिकणार नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की, “कालच मी प्रेमाने आणि अधिकाराने राज्यातील जनतेला काही सूचना केल्या आहेत. त्यावेळी हा कार्यक्रम माझ्या डोक्यात होता. एकीकडे मी लोकांना गर्दी करु नका असं सांगत असताना आजच माझा हा कार्यक्रम होता. खूप गर्दी झाली तर काय अशी मनात धाकधूक होती. पण गुलाबरावांनी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे असा आग्रह केला कारण हा कार्यक्रम जनता आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कार्यक्रम मर्यादित करावा लागेल असं मी सांगितलं होतं. नाही तर खाली बसलेल्या सर्वांना व्यासपीठावर घेऊन आणि मैदानात कार्यक्रम घ्यावा लागला असता,”

    मुख्यमंत्री म्हणाले, “आपण वाट्टेल ते बनवतो पण पिण्याचं पाणी निर्माण करु शकत नाही हे सत्य आहे आणि ते मानायला पाहिजेच. गेल्या आठवड्यात मी जव्हारला जाऊन आलो. पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडे आधीच्या सरकारने लक्ष दिलं नाही आणि आपलं एक वर्ष तर कोरोनामध्ये गेलं. तिथे गेल्यानंतर पाण्याचं भीषण वास्तव पहायला मिळालं. जसं अर्थनियोजन करावं लागतं तसं पाण्याचं नियोजनही गरजेचं असतं.”