रोह्यातील नागरिक निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई पासून वंचित

  • प्रशासनाच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी
  • सतत प्रशासनाला जागे करुनही सुस्त प्रशासन जागे होईना

रोहा: रोहा तालुक्यातील रोहा शहरासह ग्रामीण भागात ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने फार मोठ्या प्रमाणात घरांचे व झाडांचे नुकसान झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरीक निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाईपासून अद्याप वंचितच राहिले आहेत. तर काहींना एक ते दीड हजारांची शुल्लक मदत देऊन प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडल्याचे दिसत आहे. यामुळे रोहा तालुक्यातील नागरिकांची क्रूर चेष्टा झाली असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे प्रशासनाच्या कामगिरीवर नागरिकांची तीव्र नाराजी असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. नुकसान भरपाईसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी तहसील कार्यालयात सतत धाव घेत तहसील प्रशासनाला वेळोवेळी आमची नुकसान भरपाई आली नाही असा तगादा लावून जागे केले मात्र नुकसान भरपाईची रक्कम तुमची बँकेत पाठवली आहे असे सांगितले. मात्र, नुकसानीची रक्कम अद्याप जमा झाली नाही.

सतत प्रशासनाला जागे करुनही सुस्त प्रशासन जागे काय होईना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

३ जून रोजी कोकनासह रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात फार मोठे नुकसान झाले. यावर सुरुवातीला खा.सुनिल तटकरे यांनी ऑगस्ट अखेरपर्यंत मदत नुकसान ग्रस्तांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे असे प्रशासनाला बजावले होते. त्याप्रमाणे पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनीही वेळोवेळी प्रशासनाला आदेश दिले मात्र एवढे करुनही प्रशासन लोकप्रतिनिधींचे ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. एवढे प्रशासन ढिम्म का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रोहा सह रायगड जिल्ह्यात सर्व बेचिराख झाले होते. नागरिकांची राहती घरे ,फळबाग, शेती , उद्योग , यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वादळानंतर तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात येत नुकसानीची पाहणी करत नागरिकांना धीर देत सरकार तुमच्या मागे या संकटकाळी उभे राहणार असल्याचा विश्वास दिला. त्यानंतर त्यांनी रायगडसाठी भरभरून मदत जाहीर करत तातडीने तिचे वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

शिवसेना उपनेते डॉ. विनोद घोसाळकर, आ.भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे यांनी रोहा मध्ये बैठक घेत मदत ही शासनाची आहे त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपाती तुमचे काम करा अश्या सूचना रोहा प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिल्या होत्या.

रोहा तालुक्यातील कोलाड, खांब,देवकान्हे, सुतारवाडी, परिसरातील अनेकांचे संसार उदवस्त केले व कुटुंबच्या कुटूंब रस्त्यावर आले. या वादळाने अनेकांची घरे,पत्रे यांची पडझड झाली तर काही घरेच जमीनदोस्त झाली तर काहींचे धान्यही भिजवून नुकसान झाले या परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी स्थानिक आमदार खासदार मंत्री यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली, पंचनामे झाले मात्र त्याची भरपाई अद्यापही मिळालेली नाही.

निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्हा प्रशासनाकडे ३७४ कोटी ३लाख १६ हजार ₹ अनुदान नुकसानग्रस्त यांच्याकरिता प्राप्त झाले असून २८४ कोटी ८ लाख ६६ हजार ३५९₹ वाटप तर ८९कोटी ९४ लाख ६४१ ₹ शिल्लक असे दाखवले असले तरी बहुतेक ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे.