रायगड ” रेड झोन”मध्ये येणार नाही ; जिल्हाधिकारी  निधि चौधरी यांनी  व्यक्त केला विश्वास

पनवेल : रायगड जिल्हयात बाहेरून आलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्याचा प्रसार होऊ नये, याची काळजी प्रशासन घेत असून त्यामुळे जिल्हा' रेड झोन'मध्ये येणार नसल्याचा

पनवेल  :  रायगड  जिल्हयात   बाहेरून आलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्याचा प्रसार होऊ नये, याची काळजी प्रशासन घेत असून त्यामुळे जिल्हा’ रेड झोन’मध्ये येणार नसल्याचा विश्वास रायगडच्या जिल्हाधिकारी निधि चौधरी यांनी  व्यक्त केला   रायगड जिल्ह्यात मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद येथून 1 मेपासून आजपर्यंत 95 हजार रायगडकर दाखल झाले असून त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यत जिल्ह्यात 900 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी बरे होण्याचे प्रमाण हे 50  टक्के पेक्षा जास्त असून आतापर्यंत 505  नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

     एक मे पासून टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर जिल्ह्यात बाहेर राज्यात आणि शहरात राहणारे 95 हजार नागरिक हे जिल्ह्यात आपल्या वाहनाने किवा  पायी चालत दाखल झाले आहेत. यापैकी दहा हजार नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले असून उर्वरित नागरिक गृह विलगीकरणामध्ये आहेत. बाहेरून आलेल्या चाकरमान्यांमुळे ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी ज्यांना लागण झाली आहे, अशा नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही, याची काळजी आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. सध्या रायगडात 354  कोरोनाबाधित असून 41  जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या मृतांना कोरोनाशिवाय इतर आजारही होते. महाडा  येथील एक शासकीय परिचारिका सोडली तर इतर कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणेतील कर्मचारी अथवा अधिकारी यांना कोरोनाची बाधा झालेली नाही. ही एक चांगली बाब असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

        जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना आरोग्य यंत्रणेचा रोज संपर्क कोरोनाबाधितांशी येत असतो. तसेच पोलीस, महसूल, जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी कोविड 19 योद्धा म्हणून काम करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यत शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य यंत्रणेतील महाड शासकीय रुग्णालयातील परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून ती बरी होऊन घरीही गेली आहे. सुदैवाने त्याव्यतिरिक्त एकही शासकीय यंत्रणेतील व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली नाही. ही आनंदाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.