श्रीवर्धनमध्ये सापडलेल्या कोरोनाबाधिताची पत्नी, ३ मुलांनाही कोरोनाची लागण

श्रीवर्धन:श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. हा कोरोना बाधित रुग्ण हा जनता कॉलनी वरळी मुंबई या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहत

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. हा कोरोना बाधित रुग्ण हा जनता कॉलनी वरळी मुंबई या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहत होता. सुरुवातीला सर्वात जास्त रुग्ण वरळी कोळीवाडा भागातूनच सापडले होते. त्यानंतर या कोरोना बाधित इसमाने भाड्याची गाडी करून माणगाव गाठले व माणगाववरून एका खासगी गाडीने श्रीवर्धन गाठले. ७ एप्रिल रोजी त्रास होऊ लागल्यानंतर त्याने श्रीवर्धन येथील संजीवनी रुग्णालय या ठिकाणी उपचार घेतले. मात्र  तेथील डॉक्टर ऋषिकेश रुद्रवार यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ११ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातून त्यांना रुग्णवाहिकेतून पनवेल येथे पाठवण्यात आले. त्याठिकाणी या रुग्णाची कोरोना चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली. काल कोरोना बाधित रुग्ण ज्या लोकांच्या संपर्कात आला होता अशा २८ लोकांना पनवेल येथे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आले होते. या २८ जणांपैकी २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर बाधित रुग्णाची पत्नी , १ मुलगा , २ मुली या सर्वांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. या रुग्णाला मुंबईत नेल्यानंतर त्याची मुले भोस्ते गावातच होती, आता ती कोणाकोणाच्या संपर्कात आली त्या सर्वांची चाचणी करावी लागणार हे नक्कीच. प्रशासनाने ही मुले कुणाच्या संपर्कात आली आहेत. याबाबत तातडीने माहिती करून घेऊन त्यांनाही पनवेल येथे तपासणीसाठी पाठवण्यात यावे. तरी श्रीवर्धन शहरातील नागरिकांनी खबरदारी म्हणून रविवारपासून  मंगळवारपर्यंत फक्त औषधाची दुकाने, दवाखाने वगळता अन्य सर्व किराणामालासह सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.