धाटाव औद्योगिक परिसरात कोरोनाचा शिरकाव

- धाटाव परिसरातील कामगार क्षेत्रात भितीचे वातावरण सुतारवाडी : धाटाव औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी मे. सुदर्शन कंपनीतील एका कामगाराला कोरोना झाल्याचे वृत्त समजताच धाटाव ग्रामस्थांसह

– धाटाव परिसरातील कामगार क्षेत्रात भितीचे वातावरण 

सुतारवाडी : धाटाव औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी मे. सुदर्शन कंपनीतील एका कामगाराला कोरोना झाल्याचे वृत्त समजताच धाटाव ग्रामस्थांसह औद्योगिक परिसरात रोजीरोटी करणा-या कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मे. सुदर्शन कंपनीत हजाराहून अधिक कामगार काम करतात. शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यापासून कमी कामगार संख्या ठेऊन काही कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश शासनाने दिलेले होते. मात्र सुदर्शन कंपनी पूर्ण क्षेमतेने कामगार संख्या ठेवत कारखाना आजतागायत सुरु ठेवलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमधे सुदर्शन कंपनीने शासनाचे दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. त्या वेळेपासूनशासनाच्या नियमांची पायमल्ली करित पूर्ण क्षेमतेने उत्पादन कंपनीने सुरु ठेवले होते. त्यामुळे वारंवार या कंपनीतील कामगारवर्गातून भिती व्यक्त करण्यात येत होती.

जगभरातून कोरोना संसर्गजन्य महामारी आजाराने थैमान घातलेले आहे. तसेच आपल्या देशासह परिसरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असतांना धाटाव औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी मे. सुदर्शन कंपनीतील एका कामगाराचे स्वॅब चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त समजताच हि वार्ता बघता बघता धाटाव औद्यगोगिक परिसरात पसरल्याने येथील कामगारवर्गात मोठे भितीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. मे. सुदर्शन कंपनीतील कोरोना बाधीत कामगारावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे त्या व्यक्तीच्या संपर्कात तब्बल वीस ते पंचवीस जण आल्याचे सांगण्यात येत आहेत. या व्यक्तींना होम क्वारंटाईन केलेले असल्याचे समजले आहे. दरम्यान संबंधीत कामगाराला सर्दी व ताप आले होते. तरीही हा कामगार  कंपनीत काही दिवस ड्युटीवर काम करत होता. त्यानंतर दोन दिवसांनी या

कामगाराने ताप येतच असल्याने स्वतःहून नमुने देऊन उपचार सुरू केले होते. तो कामगार कोरोना पॉझिटीव्ह आहे असे अधिकृत वृत्त दि. २४जून रोजी समजताच येथील धाटाव ग्रामस्थांसह औद्योगिक परिसरातील कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र याची दखल सुदर्शन कंपनीतील स्थानिक व्यवस्थापन गांभिर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजून किती कामगार या कोरोना पॉझिटीव्ह कामगाराच्या संपर्कात आले असतील हे  सांगता येणार नाही. तसेच हि व्यक्ती रहात असलेल्या परिसरातील किती नागरिकांच्या संपर्कात आली असेल याचा तपास प्रशासनाने गांभिर्याने घ्यावा असे बोलले जात आहे.

धाटाव औद्यगोगिक परिसरात साधारणत: ३० हून अधिक कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे या परिसरात कॉन्ट्रॅक्टी कामगारासह कायमस्वरूपी काम करणारे अंदाजे १२ हजाराहून अधिक कामगार काम करतात. तसेच कच्चामाल व पक्क्या मालाची ने आण करण्यासाठी बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात मालवाहू गाड्या या औद्योगिक परिसरात दररोज येत असतात. तसेच दि.३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ झाल्याने या औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांच्या प्लान्टच्या पत्र्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे उंच उंच प्लान्टवरिल पत्रे बसविण्या करिता व कारखान्यातील झालेल्या नुकसानीतील इतर कामे करण्यासाठी बाहेरील कंत्राटी कामगार सध्या मोठ्या प्रमाणात या औद्योगिक परिसरात काम करण्यासाठी  आले असल्याचे दिसून येत आहेत. तसेच येथील औद्योगिक परिसरातील स्थानिक कंपनी व्यवस्थापन कंपनी उत्पादन काढण्यावरच जास्त भर देत असल्याचे दिसून येत आहे. यामधे कामगार मात्र भरडला जात अआहे. कामगार सुरक्षिततेबाबतीत पाहिजे त्या पद्धतीने येथील स्थानिक व्यवस्थापन गांभिर्याने दखल घेत नसल्याने येथील कामगारवर्गात कोरोना या महामारी संसर्गजन्य आजारापासून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येथील कामगारवर्गासह कामगारांच्या कुटूंबियांनाही यामुळे कोरोना लागण होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात धाटावसह रोह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र औद्योगिक परिसरातील इतर कारखान्यातील स्थानिक व्यवस्थापनाने याची गांभिर्याने दखल घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कामगारांच्या सुरक्षितते बाबत अधिक जागृक होण्याची गरज आहे.