जिल्ह्यातील शालेय पोषण आहारातील घोटाळ्याचा पर्दाफाश ; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा, मनसे आक्रमक

रोहा: रोहा भागासह सबंध जिल्ह्यातील प्राथमिक शालेय पोषण आहारातील महाघोटाळा पत्रकारांनी बुधवारी समोर आणला. त्या घोटाळ्याची व्याप्ती पाहता जिल्हयात एकच खळबळ उडाली. सर्वच शाळांना निकृष्ट धान्य,

रोहा: रोहा भागासह सबंध जिल्ह्यातील प्राथमिक शालेय पोषण आहारातील महाघोटाळा पत्रकारांनी बुधवारी समोर आणला. त्या घोटाळ्याची व्याप्ती पाहता जिल्हयात एकच खळबळ उडाली. सर्वच शाळांना निकृष्ट धान्य, तांदळाच्या वजनात घट असण्यावर खुद्द गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. पंचायत समिती प्रशासन शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तब्बल वर्षभर खेळत आहे. सालासार ट्रेडिंग कंपनी, ठेकेदार अनुपम कुलकर्णी हे नेहमीच निकृष्ट व मुदतबाह्य धान्य वितरण करीत आले आहेत. असे अनेक शाळांच्या शिक्षकांनी दूरध्वनीवरून  सांगितले. त्या गंभीर तक्रारींची दखल गटशिक्षणाधिकारी यांनी घेतली नाही. धान्य निकृष्ट असण्याला केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी त्यानंतर गटविकास अधिकारीच जबाबदार आहेत, असा अप्रत्यक्ष आरोपही काही शिक्षकांनी केल्याने विद्यार्थ्याच्या आरोग्याशी नेमके कोण खेळतो ? असा सवाल उपस्थित झाला.

दरम्यान, या पोषण आहारातील महाघोटाळ्याची दखल भाजपा, मनसेने घेतली. गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले. त्यातून निकृष्ट धान्याचा पंचनामा करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना तातडीने पाठविला जाईल, असे आश्वासन जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले. तर सालासार ट्रेडिंग कंपनी त्याचा ठेकेदार अनुपम कुलकर्णी यांचा ठेका रद्द करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे युवा अध्यक्ष अमित घाग, मनसेचे अध्यक्ष अमोल पेणकर यांनी केल्याने पोषण आहार महाघोटाळ्याची दखल जिल्हा प्रशासन किती गांभीर्याने घेतो, त्यावर भाजपा, मनसेची भूमिका काय राहते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सकस व स्वच्छतेच्या संकल्पनेला शालेय पोषण आहार वितरण ठेकेदाराने मुठमाती दिली. दरम्यान  शिक्षक, केंद्रप्रमुख भानावर आले. त्यांनी वरिष्ठांवर खापर फोडले. वर्षभर शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग खेळत असल्याचे समोर आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात शुक्रवारी संतापाची लाट पसरली आहे. मुलांना निकृष्ट धान्य दिले जाते. वजनात नेहमीच लबाडी असते, तरीही जिल्हा परिषद संबंधीत अधिकारी लक्ष देत नाहीत, ऐकमेकांना साय्य करू असेच ब्रीदवाक्य अधिकारी लिहित आलेत, असेच मोठ्या पोषण आहार घोटाळ्याच्या व्याप्तीवरून अधोरेखित झाले. ग्रामस्थ जितेंद्र जाधव, कृष्णा बामणे यांनी अनेकदा हा पोषण आहार घोटाळा उघड केला. पण संबंधित अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. मंगळवारी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पत्रकारांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी करून धान्याची पाहणी करायला लावले आणि धक्कादायक प्रकार समोर आला. तालुक्यातील सर्वच शाळांत कोट्यवधी रुपये बिलाचे निकृष्ट धान्य वितरण करण्यात आले. गंभीर प्रकाराला दोन दिवस उलटूनही गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी पंचनामा केला नाही, सबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल  दिले नाही. याचा जाब भाजपचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, मनसेचे अध्यक्ष अमोल पेणकर व पदाधिकाऱ्यांनी विचारला. त्यावेळी अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. त्यातूनच अधिकाऱ्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केल्याचे समोर आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना सालासार ट्रेडिंग कंपनी ही एकच एजन्सी धान्य वितरण करीत आहे. स्थानिक ठेकेदार अनुपम कुलकर्णी धान्य पुरवठा करतात. यातूनच सबंध जिल्ह्यात पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचे शिक्षण तज्ञानी सांगितले. प्रत्येक शाळेत वजनकाटा नसल्याने धान्याचे वजन होत नाही. त्यामुळे ठेकेदाराला चांगलेच फावले. तांदळाच्या ५० किलो पिशवीत ५ किलोची घट आली. सर्व धान्य निकृष्ठ असल्याचे समोर आले. पोषण आहार महाघोटाळ्याचे वृत्त समजताच सर्वत्र खळबळ उडाली. पोषण आहारत सर्वच मिलिभगत म्हणत अखेर भाजपा, मनसे शुक्रवारी आक्रमक झाली. जिल्हा अध्यक्ष अमित घाग मनसेचे अमोल पेणकर व पदाधिका-यांनी पंचायत समितीवर धडक दिली.
संबधीत एजन्सीचा ठेका रद्द करा, संबंधित ठेकेदार अनुपम कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत उपोषणावर आम्ही ठाम आहोत असा पवित्रा भाजपा, मनसेच्या नेत्यांनी घेतला. त्यावर  निकृष्ठ धान्याचा पंचनामा तातडीने करुन त्यासबंधी आहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल, असे ठोस आश्वासन गटविकास अधिकारी जाधव यांनी दिले. जिल्ह्यातील सर्वात मोठया पोषण आहार घोटाळ्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे किती गांभीर्याने घेतात, त्यावर भाजपा, मनसेची काय भूमिका राहते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान पोषण आहार घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे, सबंध जिल्ह्यातील हा घोटाळा उघड करणार, त्याबाबत आ. प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करु असे अमित घाग यांनी सांगितले.