अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा; भोर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग

पीडितेने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिला बेदम मारहाण करुन शारीरिक दुखापती करण्यात आल्या. त्याचप्रमाणे तिच्या आईला आणि दादाला जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

  महाड : एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या नऊ जणांविरोधात महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  पीडित मुलगी भोर तालुक्यातील गोळेवाडी येथील रहिवासी आहे. पीडिता अल्पवयीन असतानाही कोमल सुनील मोरे (रा. नर्हे, पुणे), रेश्मा महेश गायकवाड, महेश गायकवाड (रा. वारजे, पुणे) आणि सपना (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांनी जानेवारी २०१८ मध्ये तिच्या आईचा विरोध डावलून तिचे अपहरण केले.

  त्यानंतर सपना, मामी नावाची एक महिला आणि एक अनोळखी इसमाच्या मदतीने तिची विक्री केली. त्यानंतर हाच अनोळखी इसम, एक अनोळखी रिक्षावाला, एक शेठजी नावाचा इसम आणि रवि यादव नावाचा एक इसम या चौघांनी तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

  पीडितेने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिला बेदम मारहाण करुन शारीरिक दुखापती करण्यात आल्या. त्याचप्रमाणे तिच्या आईला आणि दादाला जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.

  १ जानेवारी २०१८ ते ९ एप्रिल २०२१ या कालावधीत आंबवडे (भोर), गोकुळनगर (कात्रज), शिवशंभूनगर (कात्रज), हडपसर, कात्रज, वारजे या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले आहेत. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत चांभारखिंड (महाड) येथे मोलजुरीसाठी आल्यानंतर पीडितेने शहर पोलीस ठाणे गाठून, फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी या नऊ जणांविरुध्द भा. दं. वि. कलम ३६३, ३६६, ३४२, ३७। ३७० (अ), ३७६(४), (३), ३७६(२), (जे), (एन), ३२३, ५०६, ५०७, ३४ सह पोस्को कलम ४, ८, ९(एन), १० आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

  हा गुन्हा भोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याने पुढील तपास भोर पोलीस करतील.