कोलाड रोहा बाजारपेठ बंद, आदिवासी बांधवांच्या व्यवसायावर संकट

सुतारवाडी - गेल्या मार्च महिन्यांपासून जगात कोरोनाने प्रभावीपणे शिरकाव केल्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. हातावर कमाविणाऱ्यांवर मोठे संकट आले आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना ने शिरकाव

 सुतारवाडी – गेल्या मार्च महिन्यांपासून जगात कोरोनाने  प्रभावीपणे शिरकाव केल्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. हातावर कमाविणाऱ्यांवर मोठे संकट आले आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना ने शिरकाव केल्यानंतर रोहा तालुका मात्र यापासून सुटला होता. मात्र काही दिवसातच या कोरोनाने रोहा शहराला सुद्धा सोडले नाही. तब्बल दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नाईलाजाने कोलाड व रोहा या मुख्य बाजारपेठा पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. 

प्रत्येक मोसमामध्ये आदिवासी बांधवांचा छोटा व्यवसाय वेगवेगळा असतो. पावसाळ्यात मुठे,  रानभाज्या,  फळे,  कंदमुळे आदि वर आपली उपजीविका करतात. मात्र कोलाड आणि रोहा येथील बाजारपेठ पाच दिवस बंद ठेवणार असल्यामुळे आदिवासी बांधवांच्या व्यवसायावर मोठे संकट आलेले आहे. कोरोना मुळे कुठे काम मिळेनासे झाले आहे. लावणी करण्याची कामे आता शेतकरी आपल्या कुटुंबाच्या मदतीने करत आहेत तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होत असल्यामुळे मजुरांची आवश्‍यकता भासत नाही. रानात फिरून रानभाज्या जमा करून त्या बाजारपेठेत विक्रीस आणून उदरनिर्वाहाचा मार्ग मिळत होता. आता काही दिवस आदिवासी बांधव आपल्या घराच्या परसावात भाजीपाल्याची लागवड करतात आणि बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. 

गावठी भाजी खरेदीसाठी मोठी पसंती असते. गणपती सणानंतर काकडी,  भोपळा,  दुधी, आदी फळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव बाजारपेठेत आणतात. या फळांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. कोरोनाचे रुग्ण रोहा तालुक्यात सापडल्यामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे आदिवासी बांधवांसह अनेक लहान व्यापाऱ्यांना घरातच बसावे लागत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोलाड आणि रोहा बाजारपेठेमध्ये आदिवासी भगिनी मोठ्या प्रमाणावर रानभाज्या घेऊन विक्रीस आणत असत.