चक्रीवादळग्रस्त बागायतदारांना देण्यात येत असलेली नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे मत

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या नारळ व सुपारीच्या बागायतदारांना चक्रीवादळाचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. कारण अनेक बागायतदारांचा उदरनिर्वाह बागायतीतून

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या नारळ व सुपारीच्या बागायतदारांना चक्रीवादळाचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. कारण अनेक बागायतदारांचा उदरनिर्वाह बागायतीतून येणार्‍या उत्पन्नावर चालतो. महाराष्ट्र शासनाकडून हेक्टरी ५० हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही नुकसानभरपाईची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नारळ, सुपारी किंवा बागायतीमध्ये लावलेली कोकमाची झाडे त्याचप्रमाणे फणस इत्यादी झाडे लागवड केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पन्न द्यायला दहा वर्षे लागतात. त्यामुळे शासनाने या नुकसान भरपाईचा निकष बदलून बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांमधून करण्यात येत आहे. चालू वर्षीचा पावसाळा संपल्यानंतर साधारण दिवाळीच्या नंतर नवीन लागवडीचा काळ असतो. या वेळी झाडे पडलेली आहेत ती तोडून पूर्णपणे बाजूला करावी लागतील. पडलेल्या झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करावी लागेल. सुपारीचे किंवा नारळाचे झाड लागवड केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पन्न देण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, तर कोकम, फणस यांची सुद्धा झाडे लावल्यानंतर उत्पन्न देण्यासाठी या झाडांना दहा वर्षाचा कालावधी लागतो. शासनाकडून जी नुकसान भरपाई देण्यात येत आहे ती आत्ताच झालेल्या नुकसानीची देण्यात येते. परंतु भविष्यात बागायतदार दहा वर्ष मागे आला आहे. त्याचा विचार कोण करणार ? कारण नवीन लागवड केल्यानंतर पुढील दहा वर्षे बागायतदारांचे उत्पन्न ८०% कमी होणार आहे. ज्या बागायतदारांची सुपारी या वर्षी १०० किलो झाली आहे त्या बागायतदाराची पुढच्या वर्षी सुपारी फक्त वीस किलो होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील वर्षापासून कोकम सरबत, आमसुले त्याचप्रमाणे सोलकढी याच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावरती घट होणार आहे. नारळाची झाडे देखील मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे नारळ महाग होऊन कोकणात येणाऱ्या पर्यटकांना नारळा पासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू जास्त भावाने घ्याव्या लागणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर बागायतदारांनी नवीन लागवड केली तरी मधली दहा वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्न कसे भरून देता येईल? याचा विचार शासनाने करणे आवश्यक आहे. तरी महाराष्ट्र सरकारने त्याचप्रमाणे केंद्र शासनाने देखील या चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या बागायतदारांना भरपाईच्या निकषात बदल करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भागात घरांमधून करण्यात येत आहे.