म्हसळ्यात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या फळपिकांचे पंचनामे कधी होणार – शेतकरी वर्गाचा संतप्त सवाल

म्हसळा : कोकण किनारपट्टीत ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीत म्हसळा तालुक्यातील गावागावात नागरिकांच्या राहत्या घरांबरोबरच शेत शिवार, फळबागा, पशुधन, मत्स्यव्यवसाय यांचेही मोठ्या

म्हसळा : कोकण किनारपट्टीत ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीत म्हसळा तालुक्यातील गावागावात नागरिकांच्या राहत्या घरांबरोबरच शेत शिवार, फळबागा, पशुधन, मत्स्यव्यवसाय यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीचे स्थानिक तालुका प्रशासन पंचनामे कधी करणार आणि नुकसानग्रस्तांना भरपाई कधी मिळवून देणार असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

कोकणातील रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील हजारो नागरिकांची घरे उध्वस्त झाली असून खूप मोठी वित्तहानी झाली आहे. या वित्तहानी बरोबरच कोकणच्या निसर्ग सौदर्यात भर घातलेल्या नारळी, सुपारी, आंबा, चिकू, केळी व इतर फळबागा यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जवळपास पुढील १५ ते २२० वर्षांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बुडाले आहे. हजारो हेक्टरची शेती वाया गेली आहे. काही बागायतदारांची तर ५००, १०००, २०००, ते ३००० पर्यत झाडे मोडून पडली आहेत.

अनेकांचे कित्येक पिढ्यानपिढ्या उत्पन्नाचे साधन असलेले आंबा, काजू, नारळ, सुपारी फळपिकांच्या बागा वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक त्याचबरोबर मानसिक संकटात सापडले आहेत. अनेकांनी आपल्या बागा डोळ्यासमोर उध्वस्त होत असताना पाहून अश्रू गाळले आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यायला पाहिजे. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व तालुका कृषी विभाग यांच्या समन्वयातून लवकरात लवकर फळपिकांचे नुकसानीचे पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाला भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

 नेवरूळ गावात आमच्या मालकीची जवळपास १५० पेक्षा जास्त आंबा कलमे झाडे आहेत व काजूची झाडे आहेत. ही झाडे कित्येक वर्षांपासून आमच्या उत्पन्नाचे साधन होते. चक्रीवादळाने काही क्षणातच होत्याचे नव्हते करून बाग उध्वस्त केली आहे. अद्याप कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी किंवा पंचनामे करण्यासाठी पोहचले नाहीत. जर पंचनामे झाले नाहीत तर आम्हाला नुकसान भरपाई कशी मिळणार. एकीकडे आमच्या घरांचेदेखील मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे आणि दुसरीकडे फळ पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आमच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ही विनंती आहे. –  रोहित रिकामे , नेवरूळ, शेतकरी फळबागायतदार 

पाभरे गावात आमची आंबा, नारळ, सुपारी, चिकू, रामफळ अशी फळपिकांची अंदाजे २५० पेक्षा जास्त झाडे आहेत. चक्रीवादळामुळे बागेतील सर्व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. आता सर्व उत्पन्नाचे साधन बंद होईल, अशी भीती वाटत आहे. पूर्ण बाग जमीनदोस्त झाली असून आजपर्यत कोणीही शासकीय कर्मचारी पंचनामे करण्यासाठी किंवा साधी चौकशी करायला आलेले नाहीत. तरी शासकीय पातळीवरून लवकरात लवकर पंचनामे करून आमच्या शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी. – इनायत मुगये, फळबागायतदार पाभरे