निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेकांचे संसार उध्वस्त, तहसीलदारांनी केली कर्जतमध्ये पाहणी

कर्जत : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढा म्हणा..... या ओळी आहेत प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेतील. काल समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या

 कर्जत : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढा म्हणा….. या ओळी आहेत प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेतील. काल समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यातून आलेले निसर्ग हे चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात धडकले. सबंध रायगड जिल्ह्यात या चक्रीवादळाने थैमान घातले. पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले.  कर्जत तालुक्यातही चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला. पावसाळ्यापूर्वी अनेकांनी काडी काडी करून निर्माण केलेले आपले खोपटे वादळाने एका क्षणात उडवून नेले. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर हा निसर्गाचा प्रकोप पाहण्याशिवाय कोणाकडेच पर्याय उरला नव्हता. अगोदरच लॉकडाऊनमुळे हातात पैसे नाही आणि आता वादळाने उध्वस्त केलेले खोपटे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. पण पुन्हा उभे राहण्याची इच्छा कायम आहे. त्यासाठी सरकारने पाठीवर हात ठेवणे गरजेचे आहे.

अरबी समुद्रात भयंकर रूप धारण करत कोकणात धडकलेले निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी सकाळपासूनच साधारण पाऊस सुरु होता. त्यानंतर सुमारे २ वाजता कर्जत तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. यामध्ये कर्जत, नेरळ, माथेरान या शहरांसह ग्रामीण भागाला या वादळामुळे तडाखा बसला. ९० ते १०० ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने आपल्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला लक्ष केले. यामध्ये कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठ मध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. माथेरानमध्ये रॅम बॅग पॉईंट येथील आशा पार्टे यांच्या घराचे पत्रे उडून भिंती देखील बाधित झाल्या आहेत. यासह इंदिरा नगरमधील रवी जाबरे यांचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. तर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील भाग बाबू आखाडे यांचे घरावरील संपूर्ण पत्रे उडून मागील घरावर जाऊन दोन घरांचे नुकसान झाले. मनोहर पादीर यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत तर भाताचा पेंडा संपूर्णतः भिजून गेला आहे. यासह मोहाचीवाडी येथील अर्जुन हिलम यांच्यादेखील घरावरील छप्पर उडून गेले आहे. यासह शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळणे, विद्युत खांब पडणे, विद्युत तारा तुटणे, घरावरील कौल, पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर नेरळ जवळील धामोते गावात देखील झाडे कोसळणे, यासोबत नव्याने बांधलेले गणेश डायरे यांचे मातीचे घरावरील पत्रे उडून भिंती बाधित झाल्या आहेत. डोळ्यादेखत बांधलेले खोपट उघड पडल्याने डायरे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तर यासह जामरुंग, मोग्रज, पाथरज, खांडस, ओलमन, चई, येथिल गावांसह आदिवासी वाड्या, पाडे या चक्री वादळामुळे बाधित झाले आहेत. तर वादळानंतर उधाणलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत आहेत. धाबेवाडी, रजपेवाडी, धोत्रे वाडी आदी भागात जाऊन तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख हे स्वतः परिस्थितीची पाहणी करून उपाय योजना राबवत आहेत. त्यामुळे त्याभागातील रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला होऊन रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत. तर महावितरणचे देखील या वादळात मोठे नुकसान झाले असताना या प्रसंगावर महावितरणचे कर्मचारी अधिकारी हे मत करण्यासाठी वादळ शमल्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सर्व भागात विद्युत पुरवठा सुरळीत होत आहे. मागीलअडीच महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नाही त्यामुळॆ हातात पैसे देखील नाही अशात आता निसर्गाने देखील कोप केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहेत. डोळ्यासमोर आपण बांधलेले घर ओस उघडे पडल्याने अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटले आहेत. तेव्हा या परिस्थितून बाहेर येण्यासाठी नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना मदत मिळणे गरजेचे बनले आहे. 

निसर्ग चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मी तालुक्यातील आदिवासी भागात फिरत आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना आम्ही राबवत आहोत. यासह नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 
                                                                                                                                                               –  विक्रम देशमुख, तहसीलदार – कर्जत