सुधागड तालुक्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका- झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान,भाजी मळ्यांवरही परिणाम

पाली : कोकण किनारपट्टीलगत आलेल्या चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच सुधागडलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळामुळे रस्त्यावर झाडे कोसळून पडली आहेत. या वादळाचा जोर

 पाली : कोकण किनारपट्टीलगत आलेल्या चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच सुधागडलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळामुळे रस्त्यावर झाडे कोसळून पडली आहेत. या वादळाचा जोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की काही भागातील घरावरील पत्रे,कौलारु छपरेदेखील उडून गेली आहेत. आदिवासी भागातील कच्च्या बांधकामांच्या घराच्या भिंती देखील कोसळल्या आहेत.पाळीव प्राणी, गुरे, इतर पशूंचे गोठेदेखील उध्वस्त झाले आहेत. मोकळी असणारी गुरे,पाळीव पशु हे सैरावैरा पळत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते.

या चक्रीवादळाचा जोर एवढा भीषण होता की, सुधागडातील भाजी मळयांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील भाजी वाऱ्याच्या जोराने कोलमडून पडली आहे. काही ठिकाणी विजेच्या तारा,विजचे खांब मोडून पडले आहेत.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वीज महावितरणने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केल्याने अनुचित प्रकार टळला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वादळी वाऱ्यासोबतच पावसाचे प्रमाणही खूप होते. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात शेतकऱ्यांनी शेतात भात पेरणी केली असून पावसाच्या पाण्यामुळे शेतातून बियाणे देखील वाहून गेले आहे.तसेच या वादळीवाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहनांवर देखील झाडे पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यात नागरिकांचा जीव देखील धोक्यात आला होता. झाडे कोसळून,घराच्या भिंती कोसळून,घराचे छप्पर कोसळून जीवितहानी होण्यात दाट शक्यता होती.प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून आपल्या कुटुंबासोबत आपापल्या घरातच थांबले होते. परंतु काही भागात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने काळजी घेतल्याने,आदिवासी लोकांचे स्थलांतरित केल्याने जीवितहानीपासून बचाव झाला.