रोहा भागातील लघु उद्योगांचे प्रचंड नुकसान, पंचनामे झाल्यावरही विमा कंपन्यांची नुकसान भरपाई देण्यात कुचराई

सुतारवाडी : उद्योजक दिलीप सोलंकी यांच्या रोहा तालुक्यातील खारी येथील लघु उद्योगाचे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झाले. दिलीप सोलंकी यांनी केलेले सोलंकी मसाले तसेच पोहे संपूर्ण

सुतारवाडी :  उद्योजक दिलीप सोलंकी यांच्या रोहा तालुक्यातील खारी येथील लघु उद्योगाचे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झाले. दिलीप सोलंकी यांनी  केलेले सोलंकी मसाले तसेच पोहे संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून कोणीच सुटलेले नाही. बागा उन्मळुन पडल्या, घरांचे पत्रे उडाले, काही घरे जमीनदोस्त झाली. असंख्य झाडांनी अक्षरशः माना टाकल्या. विद्युत वितरणाला जबरदस्त शॉक बसला. दक्षिण रायगड पूर्णतः उध्वस्त केले. याच निसर्ग वादळाचा फटका भात शेतीवर आधारीत लघु उद्योगातील पोहा उत्पादनाला बसल्याचे भयाण वास्तव समोर आले. खारी येथील सोलंकी फुड प्रॉडक्ट या लघु उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले. पोहा मिलवरील पूर्णतः पत्राची शेड उडून गेली. ठिकठिकाणी पत्रे फुटल्याने भाताचा साठा, पोहा, तुकडा पोहा, भुशी भिजून गेली. मशीनरी इलेक्ट्रिक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. दरम्यान, लाखो रुपयांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांचे भलतेच घुमजाव सुरू आहे. विमा कंपन्यांची मानसिकता व्यापाऱ्यांच्या जखमेवर अधिक चोळत असल्याने लघु उद्योजक व्यापाऱ्यांनी करायचे काय ? असा सवाल पुन्हा उपस्थित झाला.

 मिलवरील पत्रे उडाल्याने अंदाजे चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचे सरकारी पंचनाम्यातून समोर आले. आधीच पंचनाम्यासाठी सरकारी दरबारात अनेकदा खेटे घालावे लागले, आता पंचनामे झाले तर विमा कंपन्या जुनीच रडगाणी गातात, अशी स्पष्ट नाराजी पोहा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत सोलंकी फुड प्रॉडक्टचे भागीदार दिलीप सोलंकी म्हणाले की, पोहा मिलचे संपूर्णतः पत्रे उडाले, पावसाने पोहा, मशीनरी, इलेक्ट्रीक वस्तुंचे मोठे नुकसान केले. त्याचा महसूल विभागाने पंचनामा केला. मात्र विमा कंपनीची मानसिकता जुनीच दिसून आली. ज्यांचे नुकसान झाले आहे ते अव्वाच्या सव्वा सांगतात, असे विमा कंपन्यांना वाटते, अशी भावना सोलंकी यांनी बोलून दाखविली.
 
२००५ नंतर २०२० ला निसर्ग आपत्ती आली. तब्बल १५ वर्षे कुठलीही नैसर्गिक आपत्तीची भरपाई मागणी झाली नाही. तरीही विमा कंपन्या व्यापाऱ्यांच्या पंचनाम्याकडे संशयाने बघतात. आज लघुउद्योग चालविणे अत्यंत जिकरीचे झाले. बँकेकडून घेतलेले कर्जसुद्धा वेळेवर फेडता येत नाही. चारपाच दिवस वीज नाही. कामगारांच्या घरांचे नुकसान झाल्याने कामावर नाहीत. शेडचे काम करण्यासाठी पत्रे उपलब्ध नाहीत. पावसाळा सुरू झाला. अशात शेडचे काम झाले नाही तर पोहा उत्पादनाचे अधिक नुकसान होईल, अशा मनस्थितीत पोहा उत्पादक सापडले आहेत, असेही सोलंकी यांनी सांगितले. त्यात विमा कंपन्यांनी त्वरित भरपाई दयावी असे शासनाचे आदेश असताना विमा कंपन्या घुमजाव का करतात ? असा सवालही सोलंकी यांनी उपस्थित केला. विमा कंपन्या त्यांचा लाभ कसा होईल, नुकसानीची भरपाई कमीत कमी कशी अदा करता येईल. यासाठीच सदैव तत्पर असतात. त्यामुळे नैसर्गिक मोठ्या आपत्तीत व्यापाऱ्यांना त्रास न देता वेगळे निकष लावले पाहीजेत. सामान्यांना मदत करण्यासाठी शासन जसे पुढे सरसावते त्याप्रमाणे विमा कंपन्यांनी लघु उद्योगांना आधार द्यावा अशी अपेक्षा लघु उद्योजक दिलीप सोलंकी यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीकडे व्यक्त केली. दरम्यान, संबंधित विमा कंपन्या लघु उद्योगातील पोहा उत्पादीत सोलंकी फूड प्रॉडक्टला कितपत न्याय देतात ? हे पाहावे लागणार आहे.