श्रीवर्धन तालुक्यात गोविंदा मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय

श्रीवर्धन : श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये पार पडली. ही बैठक श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार श्रीवर्धन यांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रत्येक गावातील गोविंदा मंडळाचे दोन सदस्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करण्यात आले होते. संपूर्ण जगात व  संपूर्ण भारत देशात देखील कोरोना या महामारीने थैमान  घातले आहे. याच पार्श्‍वभूमीवर गर्दी जमू नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. ज्या पाखाडीचा कृष्णजन्म नेहमी होतो त्याच ठिकाणी पाच ते सहा जणांच्या उपस्थितीत करण्यात यावा. तसेच गणेश विसर्जन करताना देखील संपूर्ण गाव आणि किंवा पाखाड्यांनी एकत्रितपणे विसर्जन करू नये. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे. व कमीत कमी गर्दी असावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर उपस्थित सर्वांनी या गोष्टीला मान्यता दर्शवली. श्रीवर्धन शहरात प्रत्येक पाखाडी मध्ये गोविंदा पथक खालुबाजा सह आपली मिरवणूक काढते. कृष्ण जन्माच्या दिवशी सायंकाळपासून खालुबाजा सह सुरू झालेली मिरवणूक गोपाळकाल्याच्या दिवशी सायंकाळी समाप्त करण्यात येते. परंतु यावर्षी गोविंदा निघणार नाही म्हणून अनेक तरुणांचा हिरमोड झाला आहे. तसेच गणेशोत्सव काळात देखील बैठकीचा नाच किंवा भजन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करु नये किंवा सदरचे कार्यक्रम रद्द करावेत असे प्रशासनाकडून सुचविण्यात आले आहे. या बैठकीसाठी श्रीवर्धनचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,म्हसळा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे,दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार तसेच श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते.