fire in forest

जंगल भागात लागणारे वणवे रोखणे हे आव्हान ठरले आहे. मुळात शिकार आणि गवत जाळण्यासाठी हे वणवे जाणीवपूर्वक लावले जातात. मात्र ते कोण लावते हे कधीच समोर येत नाही. एखाद्या जंगलात वणवा लागला की तो दोन दोन, तीन तीन दिवस धुमसत असतो.

महाड : हिवाळा सुरू झाला आहे. नुकताच पावसाळा संपल्यामुळे वनसंपदा बहरली आहे. दुर्देवाने या बहरलेल्या वनसंपदेला वणव्यांचा शाप लागल्याचे आणि त्यामुळे ही वनसंपदा नष्ट (Deforestation )होण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. हे वणवे रोखायचे कसे, असा प्रश्न वनविभाग ( forest department) आणि पर्यावरण प्रेमींना पडला आहे.

जंगल भागात लागणारे वणवे रोखणे हे आव्हान ठरले आहे. मुळात शिकार आणि गवत जाळण्यासाठी हे वणवे जाणीवपूर्वक लावले जातात. मात्र ते कोण लावते हे कधीच समोर येत नाही. एखाद्या जंगलात वणवा लागला की तो दोन दोन, तीन तीन दिवस धुमसत असतो. त्यामुळे वनसंपदास मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असतेच, त्याचबरोबर जंगल भागातील पशू-पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडतात, त्याच बरोबर आपला अधिवास देखील गमावून बसतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडते हा आणखी एक मुद्दा.

हे वणवे रोखायचे कसे? यावर अद्यापही ठोस स्वरुपाचे उत्तर सापडलेले नाही. अनेक वेळेस जंगलभागात लागलेले हे वणवे जंगला लगत असलेल्या गावांपर्यंत पोहोचतात. त्यात काही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पोहोचण्याचे प्रकारही घडतात. वणवे गावापर्यंत पोहोचू नये यासाठी वनविभागामार्फत गावाभोवती चर खोदून जाळरेषा काढल्या जातात. मात्र, त्या फारशा उपयुक्त ठरलेल्या नाहीत. मुळात वणवे लागणारच नाहीत, याची दक्षात घेणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी ठोस स्वरुपाची उपाययोजना अद्यापही सापडली नाही.

fire in forest

महाड तालुक्यातील भिवघर येथील किशोर पवार या तरुणाने वनप्रेमी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून भिवघरच्या जंगलभागात वणवा विरोधी अभियान राबविले आहे. वणव्यांमुळे भिवघर परिसरातील वनसंपदा पूर्णपणे नष्ट झाली होती. किशोर पवार याने पुढाकार घेत, गावतील तरुणांची, ग्रमस्थांची मदत घेतली. जंगलात वणवा लागल्याचे दिसताच गावातून हंडे, कळश्यांमध्ये पाणी घेवून तो वणवे विझवायला धावू लागला. गेल्या दहा बारा वर्षांपासून तो ही मेहनत घेत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहे. या जंगलात पुन्हा वन्यप्राणी आले आहेत. पशू पक्षी दिसू लागले आहेत. केवळ वणवे रोखून किशोर पवार थांबले नाहीत. जमिनीमध्ये खड्डे खोदून त्यात प्लॅस्टीकचे ड्रम ठेवून या पशु पक्षांसाठी त्यानी पाण्याची देखील व्यवस्था केली आहे.

असाच उपक्रम महाड शहलालगत असलेल्या डोंगरात करंजखोल येथील शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या सदस्यानी देखील हाती घेतला आहे. वणव्यांमुळे हा डोंगर उघडा बोडका झाला होता. शिवस्वराज्य संस्थेने या डोंगरात वृक्ष लागवड केली. वणव्यांनी ही रोपे जळू नयेत यासाठी प्रत्येक रोपाभोवती जाळ रेषा तयार केली. दररोज या वृक्षांना पाणी देण्यासाठी संस्थेचे सदस्य या डोंगरात जातात.

वणवे रोखणे हे एक कठीण आव्हान असले तरी त्यावर मार्ग काढता येतो हे या दोन संस्थानी सिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाना जर शासनाकडून पाठबळ मिळाले, तर जंगले वणवे मुक्त करून जंगलातील वनसंपदा आणि प्राणी जिवन पुन्हा बहरण्यास वेळ लागणार नाही.