सुतारवाडीत सणाच्या दिवसात एसटीची एक तरी गाडी सुरू करण्याची मागणी

सुतारवाडी  : गेल्या सहा दिवसांपासून पावसाने जोरदारपणे पडायला सुरुवात केली. जोरदारपणे पडणाऱ्या पावसाबरोबर तुरळक पणे वारा सर्वत्र घोंगावत  असल्यामुळे अनेक ठिकाणी भीती व्यक्त केली जात आहे. गणपतीचे सण आठवड्यावर आला असून गणपती सणासाठी खरेदी करण्यासाठी पावसाची उघडीप नसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. कोरोना काळामध्ये मार्च महिन्यापासून एसटीच्या गाड्या या मार्गावरून धावत नाहीत एकतर एसटीच्या गाड्या या विभागामध्ये अद्यापही सुरू केल्या नसल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे.

यापूर्वी रोहा आगारातून सकाळी साडेपाच वाजता ताम्हिणी मार्गे पुणे एसटी सुतारवाडी मार्गे पुण्याकडे जायची ती पुन्हा दुपारी अकराच्या दरम्यान स्वारगेट मार्गे रोहा कडे जात असे त्यामुळे विळा,  नारायणगाव,  कुडली,  आंबिवली,  जामगाव,  सुतारवाडी, सावरवाडी, जावटा तसेच अन्य गावांतील ग्रामस्थांना कोलाड, रोहा धाटाव कडे जाता येत होते. रोहा येथून सकाळी साडेसात वाजता रोहा-येरळ ही एसटीची गाडी सुरू होती. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना कोलाड सुतारवाडी तसेच अन्य वाड्यातील प्रवाशांना त्याचा फायदा व्हायचा. सायंकाळी पुन्हा ही साडेचार वाजता सुटायची तसेच रात्री साडेसात वाजता कामथ ही एसटीची गाडी कामथ या ठिकाणी वस्ती साठी जात होती. ती पुन्हा सकाळी साडेसहा वाजता सुटत होती. तसेच दुपारी बारा वाजता रोहा-जावटे ही एसटी दुपारी १२ वाजता सुटायची ती सुतारवाडी मार्गे जामगाव आठलेवाडी मार्गे जावटे येथून भाले येथे गेल्यानंतर पुन्हा जावटे मार्गे सुतारवाडी रोहा कडे जायची. त्यामुळे प्रवाशांची सोय व्हायची. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाल्यामुळे तेव्हापासून आज तगायत एसटी महामंडळाच्या गाड्या या मार्गावर धावत नसल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.

गणपतीनंतर दिवाळी सण येणार असून या विभागासाठी सध्या एक तरी एसटी ची गाडी सोडली तर प्रवाशांची कुचंबणा होणार नाही अशी प्रवाशांची इच्छा आहे. सुतारवाडी आणि दशक्रोशिमध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे वारंवार लाईटचा लपंडाव सुरू आहे. वारंवार लाईट जात असल्यामुळे  ग्रामस्थ हैराण झाले आहेत.