प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवा – आमदार पाटील

पेण: गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पेण(pen) हमरापुर येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या(plaster of paris) मूर्तीची निर्मिती होत असते. केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पेण व हमरापूर गणेश मूर्तिकारांना १ जानेवारी २०२१ पासून प्लास्टरवर बंदी असा आदेश देण्यात आला आहे. तसे पत्र गणेश मूर्तिकारांना आले आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्लास्टरच्या मूर्तीवर बंदी आदेश देण्यात आला आहे .ही बंदी कायम स्वरूपी उठवावी असे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी पत्र पाठवून कळवले आहे.

कोरोना  महामारीमुळे सर्वच धंद्यांवर संकट आले असताना गणेशोत्सवावर सुद्धा अनेक निर्बंध लादण्यात आले. मात्र या वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक संकटे असताना अशी एकदम प्लास्टर मूर्तीवर बंदी घालू नये,असा आग्रह आमदार रवीशेठ पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धरल्याने प्रदूषण मंडळाने एक वर्षासाठी बंदी उठवण्याचा तात्पुरता आदेश काढण्यात आला. मात्र केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कायमची बंदी असा आदेश दिल्यामुळे आम्ही पुढे करायचे काय असा मोठा प्रश्न लाखो कारागीर व कुटुंबावर पडला आहे.

प्रदूषण मंडळाने (केंद्रीय) कारखानदारांसोबत कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला. यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने झालेल्या गणेशोत्सवामध्ये अनेक नियमांमुळे( उंचीबाबत) कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्लास्टर बंदीच्या आदेशामुळे प्रमुख केंद्र असलेल्या पेण तालुक्याला व महाराष्ट्रातील सर्व गणेश मूर्तिकार, कारागीर, व्यवसायिक व करोडो गणेश भक्तांसमोर (ग्राहकांसमोर) प्रश्न आहे. पुढील वर्षाचे काम कसे सुरू करायचे आमच्यापुढे मोठा प्रश्न पडला आहे. यातून अनेक जण आयुष्यातून उठणार असून आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही अशी कैफियत  गणेश मूर्ती कारखानदारांनी आमदार रवीशेठ पाटील यांच्यासमोर मांडली.

आपण या विषयावर चर्चा करून यातून मार्ग काढावा. रायगड जिल्ह्यात १५००० कारखाने असून ३ लाख कारागीर हे यावर उदाहरण निर्वाह करीत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ५० ते ६० लाख कारागीर हे गणपती कारखान्यावर अवलंबून असून लाखो कारागीर आणि कुटुंब गणेशमूर्ती बनवण्यावर वर्षभर स्वतः उपजीविका करीत आहेत .या सर्वांच्या  उपजीविकेचे साधन गेल्यास ते बेरोजगार होणार आहेत. गणेशमूर्ती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे व तो जगामध्ये प्रसिद्ध आहे तरी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तातडीने प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी, असे आवाहन आमदार रवीशेठ पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून केले आहे.