लॉकडाऊनमुळे विकासकामांना बसली खीळ – पाली तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अपुरी

पाली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनमूळे विकासकामांना पायबंद घालण्यात आला आहे. विकासकामांसाठी वापरण्यात येणारा निधी थांबवून तो जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्यात येत आहे.त्यामुळे

 पाली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनमूळे विकासकामांना पायबंद घालण्यात आला आहे. विकासकामांसाठी वापरण्यात येणारा निधी थांबवून तो जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्यात येत आहे.त्यामुळे या वर्षीची होणारी विकासकामे तूर्तास थांबवण्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान सुधागडातील काही भागातील नागरिकांना यावर्षी खडतर रस्त्याने प्रवास करावा लागणार हे मात्र निश्चित.

सुधागडातील अनेक भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु काही ठिकाणी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे लॉकडाउन पूर्वी जवळपास पूर्ण झाली आहेत तर काही कामे अर्धवटच राहिली आहेत. सुधागडातील पेडली नवघर या रस्त्यालादेखील मागील वर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास १कोटी च्या वर एवढा निधी उपलब्ध झाला परंतु त्याचे पुढे काय झाले ? हे मात्र नागरिकांना कळेनासे झाले आहे. पेडली नवघर या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत वर्ग झाले असूनसुद्धा रस्त्याच्या कामाला सुरुवात का झाली नाही? असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. पावसाळा सुरुवात झाली आहे आणि रस्त्याची अवस्था ही फारच बिकट झाली आहे.पेडली नवघर या रस्त्याला अनेक गावे देखील जोडली गेली आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर लोकांची,वाहनांची कायमच वर्दळ असते.यावर्षी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहने जाऊ शकत नाहीत. नागरिकांनाही पायी प्रवास करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षी रस्त्यात टाकण्यात आलेल्या पाणी जाण्याच्या मोरव्या देखील खाचल्या होत्या.त्यामधून मोठ्या जिगरीन वाहनचालकांनी वाहने चालवली होती.मात्र यंदा मात्र रस्ता प्रवासासाठी वाहनचालक व नागरिकांना आवाहनात्मक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत रस्त्याचे काम होऊ शकत नाही.  शासनालादेखील सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.विकासकामांसाठी वापरण्यात येणारा निधी हा जनतेच्या आरोग्यासाठी वापरला जाऊ शकतो,त्यामुळे रस्त्यांची कामे यंदा राखडणार हे मात्र निश्चित.अशा स्थितीत पेडली नवघर येथील नागरिकांचे रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे प्रवासादरम्यान मोठे हाल होणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या जवळील असणारा निधी रस्त्यासाठी वापरून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात तरी किमान पावसाळा जाईल, असा बनवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पेडली नवघर रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे,परंतु कोरोना सारख्या महामारीच्या काळात रस्त्याच्या कामाला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. यावर्षी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होऊ शकत नाही. त्याचे अद्याप कोणत्याही प्रकारचे टेन्डरिंग झालेले नाही.विकासकामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसकडून मला मोठा निधी प्राप्त झाल्याचे पत्र देखील मला मिळाले आहे.मात्र कोरोनामुळे तेही सध्या थांबवण्यात आले आहे. मी पाली सुधागड पंचायत समिती सभापती या नात्याने वैयक्तिक स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  – रमेश(नंदू) सुतार , सभापती,पाली सुधागड पंचायत समिती,ग्रामस्थ नवघर