श्रीवर्धन तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनास अडचणी

बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना परत पाठवून दिले. श्रीवर्धन : तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर थैमान घातले. वादळामुळे

बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना परत पाठवून दिले.

श्रीवर्धन : तीन जून रोजी  निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर थैमान घातले. वादळामुळे विजेचे खांब त्याचप्रमाणे विजेच्या तारा तुटून पडल्या. कांदळगाव ते पाभरे टॉवर लाईन, त्याचप्रमाणे पाभरे ते श्रीवर्धन हाय टेन्शन लाईन इत्यादी चे काम मालेगाव, ठाणे, कल्याण, पनवेल येथून आलेल्या महावितरणच्या स्टाफने चोखपणे केले होते. परंतु बाहेरून आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यां मधील एका कर्मचाऱ्याला खोकला, ताप त्याचप्रमाणे कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २६ जून रोजी त्या कर्मचाऱ्याचा स्वैब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. २७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास सदर कर्मचार्‍याचा घेतलेला स्वैब पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर सर्व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हातात असलेले काम सोडून ते ज्या ठिकाणी राहत होते त्या आयटीआयच्या इमारतीजवळ सर्वजण जमा झाले. त्यानंतर या पूर्ण स्टाफला रातोरात बस करून पाठवून देण्यात आले. अद्याप श्रीवर्धन शहरामधील वीजपुरवठा  शंभर टक्के देखील सुरू झालेला नाही. अजून पूर्ण तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारातच आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनासमोर फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. आज श्रीवर्धन शहरातील ज्या भागांमध्ये पन्नास टक्के वीज पुरवठा सुरू झाला होता, अशा ठिकाणी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरती येऊन तारांची जोडणी करणे, तारा रस्सीने खेचणे इत्यादी कामे करत महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला. बहुतांश ठिकाणी नागरिकांनी वीज पोलसाठी खड्डे खणले. त्यामध्ये पोल उभे देखील केले. उभे केल्यानंतर त्याला कॉंक्रिटचा थर देखील देण्यात आला. महावितरणचे कर्मचारी फक्त पोल वर चढून वीज जोडणी करत होते. परंतु आता संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या प्रशासनाला अत्यंत धावपळ करावी लागणार आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे मटेरियल देखील येऊन पडले आहे. त्याच प्रमाणे चार ते पाच मोठया क्रेन देखील दाखल झालेल्या आहेत. परंतु सदरचे काम करण्यासाठी बाहेरून कर्मचारी आणल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत करणे महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे.