diveagar gold ganesh

राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिवेआगारमधील सुवर्ण गणेश मंदिरही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करुनच या मंदिरात प्रवेश घेता येणार आहे.

श्रीवर्धन: दिवेआगर (diveagar)येथील सुवर्ण गणेश मंदिर(golden ganesh temple) पर्यटकांसाठी(tourists) खुले करण्यात आले आहे. मात्र पर्यटकांना प्रवेश करताना सॅनिटायझर लावणे बंधनकारक असून चेहऱ्याला देखील मास्क आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोरोना संबंधीच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन देवस्थान न्यासातर्फे भाविकांना करण्यात आले आहे. तशा आशयाचा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. दर्शनासाठी जाताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

सुवर्ण गणेश मंदिरातील गणेश मूर्तीची २०१२ सालच्या दरम्यान चोरी झाली होती. सद्यस्थितीला त्याठिकाणी मंदिरात गणपतीची पाषाणी मूर्ती असून सोन्याची प्रतिमा देवस्थान न्यासाच्या ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच देवस्थान न्यासाच्या ताब्यात ही सोन्याची मूर्ती मिळेल, अशी आशा विश्वास्त समितीकडुन व्यक्त करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर १९९७ रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच दिवेआगर येथील  द्रौपदीबाई पाटील यांच्या नारळ सुपारीच्या वाडीमध्ये झाडांना पाणी घालण्यासाठी खोदकाम सुरू असताना सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली होती. मूर्ती सापडल्यापासून खऱ्या अर्थाने श्रीवर्धन तालुक्याला पर्यटनाची चाहूल लागली.

ही मूर्ती दिवेआगर येथे असलेल्या श्री गणपती मंदिरातील गणेशाचा मुखवटा असल्याचे सांगण्यात येते. मूर्ती सापडल्यानंतर शासनाने ती ताब्यात घेऊन त्या ठिकाणच्या देवस्थान न्यासाच्या ताब्यात दिली. त्यानंतर ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वार्याससारखी पसरली व संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक व भाविक मूर्ती पाहण्यासाठी दिवेआगर येथे येऊ लागले. पर्यायाने दिवेआगर येथे येणारे पर्यटक श्रीवर्धन, हरिहरेश्वर या ठिकाणी येऊ लागले.

हरिहरेश्वर हे देवस्थान देखील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. तसेच पेशवे कुटुंबीयांचे हरिहरेश्वसर हे कुलदैवत आहे. सुवर्ण गणेश मंदिर व हरिहरेश्वर येथील हरिहरेश्वर व काळभैरव मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने श्रीवर्धन तालुक्यात सध्या पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. लॉकडाउन व चक्रीवादळ यामुळे नुकसानग्रस्त झालेले पर्यटन व्यावसायिक पर्यटक येऊ लागल्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत.

राज्यातील मंदिरे प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत शासनाकडून आदेश निघाल्यानंतर दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर खुले करण्याचा निर्णय देवस्थान न्यासातर्फे घेण्यात आला. कोरोना विषाणू संदर्भातल्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सॅनिटायझर, मास्क याचा वापर करून मंदिरामध्ये भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवेश दिला जात आहे.

- उदय बापट, सरपंच- दिवेआगर ग्रामपंचायत, विश्वस्त- सुवर्ण गणेश देवस्थान न्यास