चक्रीवादळात पडलेल्या झाडांना मिळणार संजीवनी – डॉ. राजेश मांजरेकरांनी दाखविले प्रात्यक्षिक

पेण:कोकणाला निसर्ग चक्री वादळाने झोडपून काढल्यानंतर कोकणातील अनेक बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बागायतदारांनी मोठ्या मेहनतीने वर्षानुवर्षे जगवलेली झाडे

 पेण:  कोकणाला निसर्ग चक्री वादळाने झोडपून काढल्यानंतर कोकणातील अनेक बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बागायतदारांनी मोठ्या मेहनतीने वर्षानुवर्षे जगवलेली झाडे उन्मळून पडलेली आहेत. मात्र कोकणी मुस्लिम गिल्ड या सामाजिक संस्थेने ही उन्मळून पडलेली झाडे पुन्हा एकदा उभी करून जगू शकतात, पुन्हा पीक देऊ शकतात हे बागायतदारांना सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी रोहा कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. राजेश मांजरेकर यांनी बागायतदारांना कार्यशाळा घेऊन त्याचे प्रात्यक्षिकदेखील दाखविले आहे. याबाबतचा हा खास रिपोर्ट.

सुरुवातीला लॉकडाऊनचे आर्थिक संकट आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ.या दुहेरी संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या तयार झालेल्या फळबागा चक्रीवादळात जमीनदोस्त झाल्या.१५ ते २० वर्षे वाढविलेले आंबा, फणस, काजू, चिकू,केळी, नारळ, सुपारी आदी फळझाडे ही चक्रीवादळात उन्मळून पडली. अगदी स्वतःचं पोटचं मूल वाढवावं तशी वाढवलेली ही झाडे उन्मळून पडल्यानंतर या कोकणी माणसाने हतबल होऊन डोक्यावर हात मारल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.मात्र मुंबईसह कोकणात कार्यरत असणाऱ्या कोकणी मुस्लिम गिल्ड या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन रायगड जिल्ह्यातील रोहा कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ डॉ. राजेश मांजरेकर यांची कार्यशाळा आयोजित केली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उन्मळून पडलेल्या झाडाला पुनरुज्जीवन कसे दिले जाऊ शकते, त्यांना नवसंजीवनी कशी दिली जाऊ शकते आणि बागायतदारांचे होणारे नुकसान कसे वाचू शकते याचे प्रात्यक्षिक वादळात पडलेले एक झाड उभे करून दाखविले. झाड पडले म्हणजे त्याचे सारे आयुष्य संपले, त्याच्यावर आता पीक येऊ शकणार नाही ही मानसिकता बाजूला सारून डॉ. राजेश मांजरेकर यांनी दिलेल्या प्रात्यक्षिकानुसार प्रत्तेक बागायतदाराने हा प्रयोग केला तर नक्कीच १५ ते २० वर्षांपूर्वी वाढवलेली झाडे पुन्हा एकदा डौलदार दिसू लागतील आणि पुन्हा पीक देण्यासाठी सज्ज होतील यात शंका नाही.