donkey in mahad road

गाढवांचा वापर बांधकाम व्यवसायात विशेषतः रस्ते आणि तत्सम शासकीय बांधकामात साहित्य वापरासाठी केला जातो. गाढवांचा व्यवसायासाठी वापर करणारे हेच लोक घोड्यांचाही वापर करित असतात. रायगड विकास प्रधिकरणाच्या किल्ले रायगडावरील संवर्धन कामांमध्ये साहित्याची गडावर वाहतूक करण्यासाठी गाढवे आणण्यात आलेली आहेत.

महाड : भटके कुत्रे (Dogs) आणि मोकाट गुरांचा त्रास कमी की काय, आता महाड (Mahad)  शहरात गाढव आणि घोड्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. शहरासह, महामार्गावर (roads) सध्या मोकाट गाढवे (‘Donkey mess’) आणि घोड्यांचा त्रास, पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागतोय.

या मोकाट गाढव आणि घोड्यांनी महाड शहरातील त्याचप्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उच्छाद मांडला आहे. रस्त्यामध्ये ही गाढवे कशीही धावत असल्याने, छोट्या मोठ्या वाहनांचे अपघात होण्याचे, पादचारी जखमी होण्याची भिती निर्माण झाली आहे. रस्ते, दुकानांबाहेरील मोकळ्या जागांमध्ये विष्ठेमुळे दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने, ही गाढवे महाड शहरातील स्वच्छता मोहिमेत मोठीच अडचण निर्माण करित आहेत.

गाढवांचा वापर बांधकाम व्यवसायात विशेषतः रस्ते आणि तत्सम शासकीय बांधकामात साहित्य वापरासाठी केला जातो. गाढवांचा व्यवसायासाठी वापर करणारे हेच लोक घोड्यांचाही वापर करित असतात. रायगड विकास प्रधिकरणाच्या किल्ले रायगडावरील संवर्धन कामांमध्ये साहित्याची गडावर वाहतूक करण्यासाठी गाढवे आणण्यात आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे गड संवर्धनाचे काम गेल्या पाचसहा महिन्यांपासून बंद आहे.

गडपायथ्याला मुक्कामाला असलेल्या या गाढवांच्या मालकांना, तेथे लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे लोक महाडकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यांनी आपले उपजीविकेचे साधन असलेले गाढव आणि घोडे देखील बरोबर आणले आहेत. मात्र त्यांना मोकाट सोडून दिल्यामुळे महाड शहर आणि महामार्गावर त्यांचा हा “गाढवी गोंधळ” सुरु झाला आहे.

नगरपालिका त्याचप्रमाणे महामार्ग बांधकाम विभागाने शहर आणि महामार्गावर गाढव आणि घोड्यांमुळे वाहने आणि पादचाऱ्यांना निर्माण झालेला धोका दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावित अशी मागणी होवू लागली आहे.