थेंबे थेंबे तळे साचे  ; तहसील , प्रांत कार्यालयाची इमारत पूर्ण गळकी

श्रीवर्धन : पाच ते सहा वर्षांपूर्वी श्रीवर्धन येथे  मध्यवर्ती प्रशासकीय भवन ही इमारत बांधण्यात आली. श्रीवर्धनचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या कल्पनेतून सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी या उद्देशाने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने या इमारतीचे निर्माण करण्यात आले. याठिकाणी श्रीवर्धनचे प्रांत कार्यालय, श्रीवर्धन तहसील कार्यालय, सबरजिस्टर कार्यालयात, त्याचप्रमाणे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय ही सर्व कार्यालये आहेत. ज्या वर्षी या इमारतीचे उद्घाटन झाले, त्या वर्षीच पावसाळ्यात इमारत पूर्णपणे गळू लागली होती. त्यानंतर संपूर्ण इमारतीच्या छतावरती पत्र्याची शेड उभारण्यात आली व इमारत गळायची थांबली होती. मात्र तीन जून रोजी श्रीवर्धन तालुक्याला जबरदस्त तडाखा दिलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मध्यवर्ती प्रशासकीय भवन या इमारतीवरील पत्रा शेड पूर्णपणे उडून गेल्याने इमारत आता पूर्णपणे गळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणण्याची वेळ आली आहे. तरी श्रीवर्धनच्या आमदार व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या इमारतीवरील पत्रा शेड लवकरात लवकर पुन्हा उभारावी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून या ठिकाणी बसणारे अधिकारी-कर्मचारी त्याचप्रमाणे येणारे नागरिक यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.