गणपती सण बारा दिवसांवर आल्याने रोह्यात नागरिकांची प्रचंड गर्दी

निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांचे पैसे बँकेत टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी तसेच गणपती सणाच्या खरेदीसाठी आपल्या बँकेच्या ए.टी.एम मधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.

सुतारवाडी –   गणपती सण अगदी तोंडावर आल्याने विविध वस्तू खरेदीसाठी रोहा शहर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गजबजलेले दिसत आहे. बँका तसेच ए.टी.एम मधून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांग दिसत असून कोठेही डिस्टनचा वापर होताना दिसत नाही. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांचे पैसे बँकेत टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी तसेच गणपती सणाच्या खरेदीसाठी आपल्या बँकेच्या ए.टी.एम मधून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.

गोकुळाष्टमीसाठी बाजारात विक्रीसाठी अत्यंत तुरळकपणे रंगेबेरंगी मडकी दिसत होती. कारण कोरोनामुळे गोविंदाला फक्त पाच जणांना परवानगी असल्याने कोठेही उत्साह दिसत नव्हता. रोहा शहरात रानभाज्यांना मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध असून आदिवासी भगिनींनी विविध प्रकारच्या भाज्या विक्रीस आणल्या आहेत. दुकान, हॉटेल,  हातगाड्या,  मिठाईचे दुकान,  लहान मोठी दुकाने उघडण्यात आल्यामुळे रोहा शहरात नागरिकांची मोठी गर्दी जाणवत आहे. या गर्दीमधील नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रोहा तालुक्यात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत.

तेथील दुकानदार,  भाजी विक्रेते यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सची सक्ती केली तर कोरोनाची साखळी तोडण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. काही व्यक्ती मास्क न लावता बिनधास्त पणे वावरत आहेत. त्यांना योग्य तो दंड आकारणे आवश्यक आहे. रोहा शहरात हातगाड्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होऊन ट्राफिक जाम होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जन्माष्टमीनिमित्त फळांच्या गाड्या सजल्या होत्या. मात्र ज्या ठिकाणी धूमधडाक्यात गोकुळअष्टमी साजरी व्हायची अशा ठिकाणी शांतता दिसत होती.