जंगलात अन्न नसल्यामुळे वन्यप्राण्यांचा गावांतील वस्तीत संचार

सुतारवाडी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील डोंगराळ भागातील काही शाकाहारी प्राणी आता गावा गावात प्रवेश करत असून अन्नासाठी अनेक ठिकाणी भटकंती करत आहेत. कोलाड मध्ये आता एका माकडाने

 सुतारवाडी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील डोंगराळ भागातील काही शाकाहारी प्राणी आता गावा गावात प्रवेश करत असून अन्नासाठी अनेक ठिकाणी भटकंती करत आहेत. कोलाड मध्ये आता एका माकडाने दिनांक ३० एप्रिल रोजी प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत इमारत,  घर,  बंद दुकानाच्या छतावर तर कधी दुकानाच्या पायरीवर हा माकड फिरत असतो मात्र कोणालाही त्रास देत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी माणूस असेल तो माणूस त्याला बिस्किट, केळ तसेच अन्य खाद्यपदार्थ खायला टाकत आहे. 

लॉकडाऊन मुळे ठराविक वेळेतच खरेदीसाठी माणसं येतात. त्यानंतर परिसरात शुकशुकाट असतो. जेव्हा माणसं असतात तेव्हा त्या माकडाचा खाण्याचा प्रश्न सुटतो नंतर तो इतरत्र अन्नाच्या शोधार्थ फिरत असतो. हा माकड वाळंजवाडी डोंगरावरून आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी वाळंजवाडी डोंगरावर प्रचंड प्रमाणावर वणवा लागला होता. या वणव्यात अनेक लहान-मोठी झाडे जळून खाक झाली होती. फळधारणा झालेले वृक्ष आगीच्या भक्षस्थानी गेली होती. त्यामुळे तेथील वन्य प्राण्यांचे विशेषतः शाकाहारी प्राण्यांचे खायचे हाल झाले. 

अन्नाच्या शोधार्थ माकड दिवसा तर डुकरासारखे प्राणी रात्री संचार करत असतात. डोंगराला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वनवे लागतात. यावर कोणीही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे पशु पक्ष्यांचा निवारा तसेच अन्नाचा बिकट प्रश्न उद्भवत आहे. जंगलात अन्न नसल्यामुळे पर्यायाने वन्यप्राण्यांना गावांतील वस्तीत संचार करावा लागत आहे. कोलाड नाक्यावर आलेल्या माकडा बद्दल कुतूहल निर्माण झाला आहे.