due to lockdown covid 19 still tourist business are closed in shrivardhan taluka
लॉकडाऊन सुरू होऊन सातवा महिना उजाडला तरी श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय ठप्पच

श्रीवर्धन: संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील (shrivardhan taluka) पर्यटन व्यावसायिकांनी (tourist businessmen) जनता कर्फ्यू व संपूर्ण लॉकडाऊन(lockdown) होण्याच्या अगोदरच म्हणजेच १५ मार्च पासून आपले सर्व पर्यटन व्यवसाय (tourist business) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला कोरोना हे एवढे मोठे संकट असेल याची कोणालाच जाणीव नव्हती. आणि इतके महिने आपला पर्यटन व्यवसाय किंवा धंदा बंद राहील याची कोणालाही जराही कल्पना नव्हती.

संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक चाकरमानी गावाकडे येण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने मुंबईहून आपल्या गावाकडे पायी चालत आल्याच्या घटना देखील घडल्या. काहींनी समुद्रमार्गे बोटी भाड्याने करून कोकणात आले. त्यानंतर देशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली व टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यास सुरुवात झाली. मोठ्या शहरांमधील उद्योगधंदे त्याचप्रमाणे मोठ्या कंपन्या काही ठराविक टक्के कामगारांची उपस्थिती ठेवून सुरू करण्यात आल्या. तसेच रायगड जिल्ह्यात देखील ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या अखत्यारीत असलेले अनेक कारखाने सुरू करण्यात आले.

१ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्ण संख्या कमी आहे अशा ठिकाणी असलेली रेस्टॉरंट त्याचप्रमाणे दुकाने व इतर सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. राज्यात बहुतेक ठिकाणी सार्वजनिक बस सेवा त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. खाजगी वाहने त्याचप्रमाणे खाजगी बस गाड्या बिनधास्तपणे सुरू आहेत. शासनाने एक सप्टेंबर पासून हॉटेल, लॉजिंग शंभर टक्के सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांसमोर ठेवून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी चालना देण्याची आवश्यकता आहे. आज श्रीवर्धन तालुक्यात श्रीवर्धन शहर, दिवेआगर त्याचप्रमाणे हरिहरेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हॉटेल्स व रिसॉर्ट आहेत या ठिकाणी येण्यासाठी पर्यटकांचे फोन देखील येऊ लागले आहेत. परंतु येणाऱ्या पर्यटकांमध्ये एखादा पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याची लागण इतरांना होऊ शकते यासाठी आलेल्या पर्यटकांची कोणत्या प्रकारे टेस्ट करावी यासाठी शासनाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे पर्यटन व्यावसायिकांना कळविणे अत्यंत गरजेचे आहे. मागील सात महिन्यांपासून श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिक उदाहरणार्थ हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक, खाणावळी इत्यादी सर्व पूर्णपणे बंद आहेत.

त्याचप्रमाणे या ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांच्या हातात कोणतेही काम नाही. तसेच या व्यवसायाशी निगडित असणारे अनेक घटक मच्छिविक्रेते, भाजीविक्रेते त्याचप्रमाणे लॉन्ड्री चालक, इलेक्ट्रिशियन यांनादेखील मागील सात महिन्यांपासून कोणताही व्यवसाय नाही. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे अनेक वाहनचालक की जे आपल्या खासगी वाहनांमधून पर्यटकांना त्यांच्या इच्छित स्थळी फिरवून आणतात त्यांचाही धंदा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तालुक्यातील दिघी ते आगरदांडा व बागमांडले ते वेशवी ही फेरीबोट सेवा देखील मागील दोन महिन्यांपासून सुरू झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यात मच्छीमाराला देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र आता गरज आहे ती शासनाकडून पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी चालना देण्याची.

सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर याठिकाणी पर्यटक येऊ लागले तरच मागील वर्षी झालेला पूर्णपणे तोटा येत्या डिसेंबरपर्यंत भरून काढण्याची संधी व्यवसायिकांना मिळेल. अन्यथा व्यवसायिकांची अवस्था आत्महत्या करण्यापलीकडे कोणतीच असणार नाही. तरी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही विशेष योजना राबवता येतील का? किंवा श्रीवर्धनी या ठिकाणी काही विशेष बैठक घेऊन शासकीय अधिकारी किंवा पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे लोक यांना आमंत्रित करून रायगडच्या पालकमंत्री व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.