injured crocodile at mahad

महाडजवळ (mahad)मंगळवारी सकाळी गांधारी नाका ते हायवे मधील साहिलनगरच्या रस्त्यालगत असलेल्या नदीच्या काठावर मगर (crocodile)निपचीत पडून असल्याचे वाहतूक पोलीस साळुंखे व पाटील यांनी सिस्केप(Seescap) संस्थेला कळविले. त्यानंतर घटनास्थळी वनखात्याचे कर्मचारी व सिस्केपचे बचाव पथक तात्काळ दाखल झाले.

  महाड: महाड(mahad) शहराजवळील सावित्री नदीच्या(savitri river) किनारी निपचीत पडलेल्या मगरीला(crocodile) सुरक्षित पकडून तिला झालेल्या अनेक जखमांवर उपचार करून त्या मगरीची सिस्केप संस्था व वनखात्याकडून मंगळवारी दिवसभर देखभाल घेतली जात होती. मात्र अखेर दुपारी या मगरीने आपला प्राण सोडला.

  जखमी, कुपोषित किंवा संकटात सापडलेल्या वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी गेली अनेक वर्षे सिस्केप संस्थेकडून मागणी होत असलेले रेस्क्यू व उपचार केंद्र नसल्याने अशा जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणे अवघड होत असल्याचे मत सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले.जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  महाड परिसरातील सावित्री नदीसभोवताली सह्याद्री पर्वतरांगांच्या महाबळेश्वर, लिंगाणा माची, किल्ले रायगड, दासगाव-नाते खोरे, पोलादपूरचा दुर्गम व डोंगराळ परिसरातून वेगवेगळया नद्यांचे विस्तीर्ण जाळे पसरले आहे. ४३०० फूटावरील उंच पर्वत रांग १८०० फूटाच्या सखल पर्वतरांगांतून ६०० ते ८०० फूट डोंगरदऱ्यांच्या संवेदनशील वनराजीचा भाग वन्यजीवांसाठी अतिशय पोषक असा आहे.

  या जंगलांमध्ये बिबट्या, वाघ, हरण, तरस, कोल्हे, लांडगे, खवले मांजर, रानमांजरी, उदमांजर, अजगर, गिधाड आणि शिकारी व जंगली पक्षांच्या विविध प्रजातींची नोंद सिस्केप संस्था सातत्याने घेत आहे. यामध्ये २४ अतिधोक्यात आलेल्या वन्यजीवांचा समावेश होतो. त्यातील मार्श क्रोकोडाईल (मगर) या प्रजातींचा वावर गेली दोन दशकामध्ये महाड परिसरात सतत दृष्टीस पडत आहे. सिस्केप संस्थेच्या माध्यमातून आणि वनविभागाच्या सहकाऱ्यांने गेल्या पंधरा वर्षात ६८ मगरींना सुरक्षित पकडून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात यश आले आहे. तर काही मगरी नैसर्गिकरित्या किंवा संशयास्पद मृत पावल्याच्या घटना देखील वन खात्यात नोंदल्या गेल्या आहेत.

  injured crocodile

  मंगळवारी सकाळी गांधारी नाका ते हायवे मधील साहिलनगरच्या रस्त्यालगत असलेल्या नदीच्या काठावर मगर निपचीत पडून असल्याचे वाहतूक पोलीस साळुंखे व पाटील यांनी सिस्केप संस्थेला कळविले. त्यानंतर घटनास्थळी वनखात्याचे कर्मचारी व सिस्केपचे बचाव पथक तात्काळ दाखल झाले. सुरुवातीस ही मगर पूर्णपणे कोरडी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिच्या अंगावर ओले गोणते व पाणी याचा मारा केला. थोड्या वेळात तिची हालचाल सुरू झाली.

  संस्थेचे सदस्य चिंतन वैष्णव, अक्षय भोवरे, तुषार चव्हाण, सुशांत कुडपणे, परेश खाडे, ओम शिंदे, श्रद्धा जोशी इत्यादी सदस्यांनी मगरीला सुरक्षित पकडून स्ट्रेचरवरून पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याठिकाणी डाॅ. लोंढे यांनी तसेच डाॅ. शिरोळे यांनी उपचार सुरू केले. शरीरावरील जखमा स्वच्छ करून त्यावर औषधोपचार केले. वनखात्याचे जाधव यांनी रितसर पंचनामा केला. मात्र दुपारनंतर या मगरीने आपला प्राण सोडला. आता हा मगरीचा मृत्यू नैसर्गिक आहे किंवा कसा याबाबत वन खात्याकडून संशोधन होणे गरजेचे आहे.

  तापमान वाढीमुळे नदीमधील क्षारता वाढत आहे. तसेच प्रदूषणाचा देखील परिणाम या मगरींच्या पचनसंस्थेवर झाला असावा असा प्राथमिक अंदाज सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तरीही या मगरीच्या अंगावरील जखमा पाहता कोणत्यातरी आघाताला ती सामोरी गेली असावी असाही अंदाज सिस्केप संस्थेकडून व्यक्त होत आहे.

  आजपर्यंत अशा प्रकारचे वन्य जीव महाड वन विभागाने तसेच सिस्केप संस्थेने साततत्याने वाचवायचा प्रयत्न केला आहे. यामध्ये हरणांचा देखील समावेश आहे. अपुरी वन्य जीव वैद्यकीय व्यवस्था व उपचारानंतर पुनर्वसन व्यवस्थेची कमतरता यासर्व बाबी चिंताजनक आहेत. यासंदर्भात महाड ते वरंध रस्त्यावर यापूर्वी वनविभाग व सिस्केप संस्थेच्या पाहणीनुसार एक जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु यावर शासन निर्णय होत ऩसल्याने असंख्य वन्य प्राण्यांना जीवास मुकावे लागत आहे. यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे व स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी अद्ययावत वन्य प्राणी बचाव व उपचार केंद्राची उभारणी करावी अशी मागणी निसर्गप्रेमी व सिस्केप संस्था करीत आहे.