mumbai goa highway

नागोठणे: गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून  मुंबई गोवा महामार्गाचे(mumbai goa highway) काम कासवगतीने सुरु आहे. दरवर्षीच अविरत अशी खड्डयांची(potholes) परपंरा सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर यावर्षीही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून पेण ते कोलाड या दरम्यान अक्षरश: महामार्गावर खड्डयांची चाळण झालेली दिसत आहे.ऐन गणेशोत्सव काळातही या मुंबई गोवा महामार्गाची पूर्णपणे दुरवस्था झालेली होती. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरुन वाहन चालवणे मोठी डोकेदुखी ठरत आहे. महत्त्वाच्या अशा असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर या भयानक खड्डयांमधुन वाट काढता काढता वाहन चालकांचा जीव अक्षरश: मेटाकुटीला येत आहे. त्यातच खड्डयांतुन वाहन चालवत असताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळेच मेकॅनिकल व टायरवाले यांना सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे.

खड्डेमय महामार्गावर सद्यपरिस्थिती जे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने नुसतीच वरचेवर खडी टाकुन खड्डे भरले जात आहेत. पंरतु ही खडी टाकुन जे खड्डे भरले जातात ती खडी वाहनांची असणारी सततची वर्दळ यामुळे एक-दोन तासातच खड्डयांमधुन बाजुला ऊडुन गेल्यामुळे पुन्हा खड्डयांची अवस्था जैसे थे होत असल्याचे दिसून येत आहे.

याच खड्डयांमुळे वाहने खड्डयांत आदळुन वारंवार वाहनांचे टायर पंक्चर होणे, गाड्यांचे वेगवेगळे पार्ट तुटणे असे प्रकार घडत आहेत. त्यातच या खड्ड्यांमधे टाकण्यात येणारी खडी रस्त्यावर पसरल्यामुळे दुचाकीला अपघात होऊनही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे वाहने दुरुस्त करणारे मेकँनिकल व टायरवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र वाहनचालकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसत आहे. त्यामुळे आता कमी प्रमाणात पाऊस पडत असताना महामार्गाचे संबधित असलेल्या ठेकेदाराने या गंभीर अशा बाबींकडे तसेच या खड्डेयुक्त रस्त्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावे जेणेकरून या मार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये अशी माफक अपेक्षा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व नागरिकांकडून वारंवार होत आहे.