गटशिक्षणाधिकारी नाही थाऱ्यावर, म्हसळ्याचा शिक्षण विभाग वाऱ्यावर

श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा : म्हसळा(mhasala) तालुक्यातील शिक्षण विभागाचा(education department) विविध समस्यांचा(problem) दुष्काळ काही संपल्या संपत नाही. सध्याच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर तालुक्यात कोणाचाही अंकुश राहिला नसून शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.
मागील कित्येक वर्षांपासून म्हसळा तालुक्यासाठी कायम स्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळत नाहीत. अनेक वर्षांपासून हे पद रिक्त आहे. आताही तालुक्यात दहा दिवस गटशिक्षणाधिकारी हजर नसल्याने म्हसळा तालुक्याला कोणी गटशिक्षणाधिकारी देताय का गटशिक्षणाधिकारी..? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शिक्षण विभागाच्या या महत्वाच्या प्रश्नासंदर्भात पंचायत समिती म्हसळा, रायगड जिल्हा परिषद अशा स्थरावर पालकांनी मागणी करूनही हा प्रश्न अद्याप सुटत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून या विभागाच्या अंधाधुंदी कारभाराला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होत असून म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागाला वाली कोण राहिला नाही..? अशी खोचक प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. तर एकीकडे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची सतत इकडून तिकडे बदली होत असल्याने आणि तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळत नसल्याने गटशिक्षणाधिकारी नाही थाऱ्यावर आणि म्हसळा शिक्षण विभाग वाऱ्यावर अशी केविलवाणी दयनीय अवस्था झाली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणून संतोष शेडगे हे काम पाहत होते तर काही महिन्यांपूर्वी त्यांची विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी या पदावर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांची महाराष्ट्र शासनाच्या शासकीय स्तरावरून पालघर जिल्ह्यातील वसई येथे बदली झाली आहे असे समजले. तसेच २ सप्टेंबर २०२० पासून प्रदीप डोलारे यांनी म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज सोडला असून ते वसई येथे हजर झाले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून म्हसळा तालुका शिक्षण विभागाचा कारभार गटशिक्षणाधिकारी यांच्या विना सुरू आहे. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी संतोष शेडगे यांच्या माहितीनुसार सध्या गटशिक्षणाधिकारी प्रदीप डोलारे हेच आहेत असे सांगण्यात आले आहे. म्हणजे तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देखील माहीत नाही की आता म्हसळा तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी नक्की कोण आहे..?.

 दिनांक २ सप्टेंबर रोजी माझी शासकीय स्तरावरून ए बीडीओ म्हणून बदली झाली असून मी आता पालघर जिल्ह्यातील वसई येथे हजर झालो आहे. दोन सप्टेंबर रोजीच मी म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज सोडला आहे. – प्रदीप डोलारे, माजी गटशिक्षणाधिकारी म्हसळा तालुका

 सध्या म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी प्रदीप डोलारे हे आहेत. त्यांची बदली झाली असल्याचे समजते. गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज माझ्याकडे नाही. – संतोष शेडगे, विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग पं.स.म्हसळा)