accident raigad

तब्बल तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वरंध भोर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात महाड एमआयडीसी पोलिसांना यश आले असून चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी वरंध भोर रघाटातील पारमाची गावच्या हद्दीमध्ये तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे

महाड : महाड पंढरपूर राज्यमार्गावरील वरंध भोर घाटात (Warandh Bhor Ghat) अवघड वळणावर अडकलेला टँकर बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात महाड एमआयडीसी पोलिस ( Mahad MIDC Police) ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांना अखेर यश प्राप्त झाले आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड पंढरपूर राज्यमार्गावरील पारमाची गावच्या हद्दीतील वरंध भोर घाटातील अवघड वळणावर पुणेकडून महाडकडे येणाऱा ट्रँकर क्रमांक एम एच ४५ बी ७०९५ हा बुधवार १८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अवघड वळणावर अडकून पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश विन्हेंकर यांनी स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता वाहतूक सुरळीत केली आहे.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नितीन सकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार १८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वरंध भोर घाटातील अवघड वळणावर पुणे बाजूकडून महाड बाजूकडे जाणारा टँकर अडकून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वरंध भोर घाटामध्ये रायगड जिल्ह्याच्या हद्दीत घाटाचा काही भाग पावसाळ्यात कोसळल्याने या घाटामधून अवजड वाहनांना बंदी असताना पुणे जिल्ह्यातून मात्र सर्रास अवजड वाहने सोडली जात असल्याचे निदर्शनास येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला पुणे जिल्हा पोलिसांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे वरील घटनेतून निदर्शनास येत आहे. खात्यांमध्ये असणाऱ्या समन्वयाच्या अभावामुळे ऐन सणासुदीत गावाकडून पुणे जिल्ह्यात परतणार्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तब्बल तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वरंध भोर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात महाड एमआयडीसी पोलिसांना यश आले असून चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी वरंध भोर रघाटातील पारमाची गावच्या हद्दीमध्ये तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या हद्दीमध्ये तपासणी केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी चाकरमनी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.

महाड पंढरपूर राज्यमार्गावरील वरून भोर घाटातून टाकण्यात आलेल्या मोबाईल केबलमुळे या घाटाचा काही भाग गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात कोसळून हा घाट नादुरुस्त होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या घाटातून प्रवास करणे धोकादायक बनले असून अवजड वाहतुकी मुळे रत्नागिरी रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.