विन्हेरे भागात विजेचा लपंडाव , कर्मचारी नसल्याने वीज वितरण कंपनी हतबल

महाड: सध्या संपूर्ण महाड(mahad) तालुक्याला विशेषत: विन्हेरे विभागात वारंवार वीज पुरवठा(electricity supply) खंडीत होत असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. तसेच विद्युत वितरण कंपनीकडेच कामगारांची कमतरता असल्यामुळे पुढील काही महिने वीज पुरवठा खंडीत होणार असल्याने ऑक्टोबर हिटच्या झळा आणखी सोसाव्या लागणार असल्याचे वास्तव समोर येत आहे.

दरम्यान गेला महिनाभर विन्हेरे(vinhere) विभागात विजेचा लपंडाव सुरु आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा तर कधी दिवसभर बत्ती गुल होत आहे. त्यात सध्या वातावरणातील पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अजून ऑक्टोबर हिट बाकीच आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्थांच्या अडचणींबरोबर ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचेही प्रचंड नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनी जर यात हतबल होत असेल तर लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढते. जनतेच्या समस्या कोणत्याही परिस्थितीत सोडवणे हे त्यांच काम आहे. मात्र याकडे कुणीही डोकावून पाहात नाही, हीच विन्हेरे ग्रामस्थांची खरी समस्या आहे.

विशेष म्हणज विन्हेरे विभागातील २० ते २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले वृद्ध विजय सावंत यांनी एका लेखी पत्राद्वारे वीज वितरण कंपनीला तात्काळ कार्यवाही करण्याचे कळविले आहे. मात्र विन्हेरे विभागातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अंधारात झोपलेत का ? असा सवाल ग्रामस्यांना पडला आहे.

याबाबत वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता एस.एन.पाटील विन्हेरे विभाग यांच्याकडे विन्हेरे विभागात वारंवार होत असलेल्या वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत विचारणा केली असता विन्हेरे विभागात २३ गावे येतात. यामध्ये ८४ किलो मिटर विद्युतवाहिनी फिरते ती डोंगर कपाऱ्यातून येथे १२ वायरमनची मंजूरी आहे. यापैकी फक्त २ वायरमन संपूर्ण विन्हेरे विभागात कार्यरत असून त्यातील एकाची कालच बदली झाली आहे. अशातच मी काम करत असल्याची धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली आहे.

पाटील यांनी दिलेली धक्कादायक माहिती पाहाता विन्हेरे विभागाला आणखी काही महिने अंधारात घालवावे लागणार हे सत्य नाकारता येत नाही. कारण विन्हेरे विभागाला विद्युत पुरवठा सुरळीत सुरु होण्यासाठी मनुष्यबळाची नितांत गरज आहे, ही जबाबदारी जेवढी वितरण कंपनीची आहे. तेवढीच ती आमदार भरत गोगावले यांचीही आहे त्यांनी या गंभीर घटनेकडे प्राधान्यानी बघणे आवशक आहे.

सात सप्टेंबर रोजी ढगांच्या आणि विजांच्या जोरदार गडगडाटामध्ये विद्युत पोलवरील १० ते १५ इन्सूलेटर फुटले होते तर कंरजाडी तांबडी कोंड दिवेकरवाडी येथील मेन लाईन वरील कंडक्टर तुटले होते. शिरगाव येथील एक पोल वादळानी झुकला होता. सांयकाळी सुरु केलेल काम पहाटेपर्यंत केल्यावर विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला, असेही एस. एन . पाटील म्हणाले सध्या आपण फक्त एक वायरमन आणि काही कॉन्ट्रॅक्टची माणस घेवून काम करित आहोत असेही पाटील म्हणाले.
विन्हेरे विभागात विजेचा लपंडाव हा नेहमीचा आहे. एकदा वीज गेली की दोन दोन तीन तीन दिवस येत नाहीत. ग्रामस्थांना, छोट्या मोठ्या व्यवसायिकांना त्रास सहन करावा लागतो. बिले भरमसाठ येत असतात. महावितरणने ग्राहकांचा अंत पाहू नये. आवश्यक दुरुस्त्या तातडीने कराव्यात. – सुमित पवार, ग्रामस्थ फौजी अंबावडे