३ जूनपासून सुतारवाडी दशक्रोशितील विद्युतपुरवठा बंद , ग्रामस्थांपुढे मोठे संकट

सुतारवाडी - ३ जून २०२० रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या चक्रीवादळामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले. रस्तोरस्ती असलेले लाईटचे भक्कम पोल क्षणार्धात जमीनदोस्त

 सुतारवाडी – ३ जून २०२० रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या चक्रीवादळामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले. रस्तोरस्ती असलेले लाईटचे भक्कम पोल क्षणार्धात जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी या लाईटच्या पोलला असलेली उच्च दाबाची वायरिंग रस्त्यावरच लोंबकळत तसेच रस्त्यावर आडवी झाली त्यामुळे सुतारवाडी दशक्रोशितील विद्युतपुरवठा ३ जूनपासून बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामस्थांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी लाईटने खेचले जाते. तसेच मोठ्या टाक्या आहेत तसेच त्या टाक्यांमध्ये लाईटच्या सहाय्याने पाणी खेचले जाते.

लाईट नसल्यामुळे ग्रामस्थांना दूरवर जावून डोक्यावर पाणी तसेच बैलजोडीच्या साहाय्याने पाणी आणावे लागत आहे. लाईट नसल्यामुळे दशक्रोशितील फ्रिज,  पंखे,  बंद असल्यामुळे तसेच पिठाची गिरणी झेरॉक्स, बँकेचे व्यवहार ठप्प असल्यामुळे अनेकांची मोठी कुचंबना झाली आहे. ग्रामीण भागात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. पिठाच्या गिरण्या बंद असल्यामुळे अनेकांना भातावर समाधान मानावे लागत आहे.

तसेच सध्या ग्रामीण भागातील नुकसान झालेल्यांचे  पंचनामे सुरू असून त्यासाठी असेसमेंट उतारा,  बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स,  फोटो, आदि लाईट नसल्यामुळे उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. अनेक परिसरात तसेच रस्त्यावर लाईट पोल कोसळले असल्यामुळे लाईट कधी येईल हे सांगता येत नाही. मात्र वायरमन त्या-त्या परिसरात मोठ्या शर्थीने लाईट पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.