सिस्केपने सायकलिंगमधून साधले पर्यावरणीय सिंहावलोकन..

महाड : दसऱ्याच्या निमीत्ताने पर्यावरणस्नेही सायक्लींग मोहीमतून सिस्केप संस्था व उतेकर फिटनेस क्लबने आज पर्यावरणीय सिंहावलोकन केले. ५८ सायकलस्वारांनी यात भाग घेतला तर या मोहीमेत नऊ ते दहा वर्षाच्या काव्य जोशी, सारा राऊत सह सहा वर्षाचा कृष्णा संकेत वडके यांचा सहभाग एक आकर्षण ठरले होते.

महाड : दसऱ्याच्या निमीत्ताने पर्यावरणस्नेही सायक्लींग मोहीमतून सिस्केप संस्था व उतेकर फिटनेस क्लबने आज पर्यावरणीय सिंहावलोकन केले. ५८ सायकलस्वारांनी यात भाग घेतला तर या मोहीमेत नऊ ते दहा वर्षाच्या काव्य जोशी, सारा राऊत सह सहा वर्षाचा कृष्णा संकेत वडके यांचा सहभाग एक आकर्षण ठरले होते.

आज सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सायकलिंग मोहीमेस सुरुवात झाली. यावेळी सिस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री व उतेकर फिटनेस क्लबचे चेतन उतेकर यांनी सायकलींगचे महत्व सांगितले. चारचाकी वाहन बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातुकरता २० फुटबॉल मैदाने एवढी जमीन खणली जाते. तर सायकलसाठी वापरण्यात येणारे धातू हे टाकाऊतून टिकाऊ म्हणजे पुनर्वापरातून वापरले जाते‌. चारचाकीच्या वापरात पुन्हा प्रचंड प्रदूषण होते. पण सायकलच्या वापरात कोणतेही प्रदूषण होत नाही उलट शरीराला उत्तम व्यायाम होतो असे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले.

महाड येथे उतेकर फिटनेस क्लब मध्ये असाच क्राॅसफिट हा व्यायामप्रकार सुरु केला असून हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. यातून आपल्या ताकदीची क्षमता तपासली जाते. सायकलिंग हा देखील त्यातलाच एक प्रकार असून या पर्यावरणीय सिंहावलोकनातून स्वत:च्या आरोग्याबरोबर निसर्गाच्या आरोग्याचे रक्षण आपण केले पाहीजे हा संदेश समाजात पसरावा या करीता या सायकलिंग मोहीमेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती मेस्त्री यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. विकास नगरकर यांनी हिरवा झेंडा दाखवला व घोषणेच्या गजरात सायकलिंगला सुरुवात झाली. आठ किलोमीटर अंतरावरील सोनारकोंड येथील पहील्या टप्प्यात गावदेवी मंदीरात सहभागी सायकलस्वारांना डॉ. आदित्य मामुणकर यांनी सायकलींगचे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परीणामांबाबत मार्गदर्शन केले.

या प्रवासात सायकलस्वरांनी मोर, मलबार पाईड हॉर्नबील, ग्रे हॉर्नबील, सर्पगरुड, पहाडी मैना, कवड्या साप असे वन्यजीव पाहीले. दुसऱ्या टप्प्यात सोनारकोंड ते मांडला येथील गावदेवी डोंगर या देवराईपर्यंत प्रवास झाला. याठिकाणी वनश्रमपरीहार झाल्यानंतर उपस्थित सायकलस्वारांना देवराई विषयी माहीती सिस्केप सदस्यांनी दिली. या दरम्यान जैवविविधतेबाबत मार्गदर्शन करीत सायकल मोहीमेच्या परतीचा प्रवास सुरु झाला. चवदार तळे येथे या पर्यावरणीय सिंहावलोकनाच्या सायकलींग मोहीमेचा सांगता समारंभ झाला.

यात प्रिती रॉय, मृण्मयी जोशी, सलोनी धाडवे, गायत्री तलाठी, संकेत वडके यांनी अनुभव कथन केले. या मोहीमेचे नियोजन योगेश चिंतन, चिराग मेहता, चिंतन वैष्णव, ओमकार सावंत, निमिष गांधी, ओम शिंदे, मित डाखवे यांनी केले होते. अशाच सायकलींग मोहीमेत डिसेंबर महिन्यात गोवा सायकल भटकंती मोहीमेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्रद्धा जोशी (९५५२५११७११) व योगेश गुरव (८८८८२३२३८३) यांनी दिली आहे.