अखेर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

पाच दिवसानंतर अखेर महाडच्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत जेवढे लोक बेपत्ता झालेत त्या सर्वांना मृत घोषित करा, अशी मागणी तळीयेच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    महाड : पाच दिवसानंतर अखेर महाडच्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत जेवढे लोक बेपत्ता झालेत त्या सर्वांना मृत घोषित करा, अशी मागणी तळीयेच्या ग्रामस्थांनी केली आहे.

    त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

    मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. तसेच आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवया आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

    अजूनही 32 नागरिक बेपत्ता

    पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले.

    मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. डोंगराच्या दरडीबरोबर दोन ते चार किलोमीटरपर्यंत हे नागरिक घरंगळत गेले असावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या संपूर्ण दोनचार किलोमीटरच्या परिसरातही शोधाशोध करण्यात आली. यावेळी पाऊस जास्त असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. तसेच सर्वत्र चिखल झाल्याने त्यातून मार्ग काढत जाणंही कठिण होत होतं.

    नेमकं काय घडलं तळीयेत ?

    गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.