कोरोनाचे नियम माजी उपनगराध्यक्षांनीच तुडवले पायदळी, लग्नासाठी दोन हजार लोक गोळा झाल्याने गुन्हा दाखल

कोरोना प्रतिबंधक नियम(corona rules) पायदळी तुडवित लग्न समारंभासाठी सुमारे दोन हजारांचा(crowd at marriage) जमाव जमविल्या प्रकरणी महाड नगरपालिकेचे नगरसेवक वजीर कोंडीवकर, माजी नगराध्यक्ष महंमद अली पल्लवकर यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाड:कोरोना प्रतिबंधक नियम(corona rules) पायदळी तुडवित लग्न समारंभासाठी सुमारे दोन हजारांचा(crowd at marriage) जमाव जमविल्या प्रकरणी महाड नगरपालिकेचे नगरसेवक वजीर कोंडीवकर, माजी नगराध्यक्ष महंमद अली पल्लवकर यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वजीर कोंडीवकर यांनी १९ मार्च रोजी आपल्या मुलाच्या विवाहाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन महिकावती नाका येथे केले होते. मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर परवानग्या घेतल्या नव्हत्या. या ठिकाणी सुमारे दीड ते दोन हजार स्त्री पुरुषांचा जमाव जमला असल्याची माहिती, पोलिसांना मिळाल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी तेथे भेट दिली.

    समारंभाचे आयोजक वजीर कोंडीवकर यांनी यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतल्या नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर पोलीस नाईक आशुतोष म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी वजीर कोंडीवकर, महंमद अली पल्लवकर यांच्यासह २५ जणांविरुध्द भा. दं.वि. संहिता कलम १८८, २६९, २७०, २९१ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब), सह महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११सह साथीचे रोग प्रितबंधक अधिनियम १९८७ चे कलम २, ३, ४ आणि मुंबई पोलीस कायदा कलम ३३(एन)/१३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीस नाईक व्ही. एस. शिंदे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.