आजी-माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट

महाड : आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ देशाच्या सीमेवर निस्वार्थीपणे  जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडुन सूट मिळण्याबाबतच्या मागणीला 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर  शासनाने अखेर मान्यता दिली असून  सैनिकी परंपरा असलेल्या महाडमधील  आजी माजी सैनिकांनी शासनाला धन्यवाद दिले आहेत .या संदर्भात तालुका माजी सैनिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन मनोहर सकपाळ उपाध्यक्ष भिकू पेडामकर यांनी शासनाचे अभिनंदन केले असून मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला  मालमत्ता करा संदर्भातील सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल फौजी आंबावडे सैनिक विकास मंडळा मार्फत संस्थेचे अध्यक्ष सुभेदार श्रीराम पवार यांनी  शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.  .

सैनिकी परंपरा असलेल्या महाड तालुक्यातील माजी सैनिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन मनोहर सकपाळ यांनी या निर्णयामुळे मंडळाचे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान सैनिकी परंपरेतील आजी माजी सैनिकांना मिळेल असा विश्वास व्यक्त  करून महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले .

मागील पंधरा वर्षांपासून शासनाने यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी सरांवर प्रलंबित ठेवला होता अशी माहिती सुभेदार श्रीराम पवार यांनी दिली. महाड पोलादपूर तालुका सैनिकी परंपरेचा तसेच वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून ओळखला जातो महाड तालुक्यातील फौजी अंबावडे गावातील प्रत्येक घरातील एक तरुण आज भारतीय सैन्य दलात देश सेवेकरिता कार्यरत आहे .दुसऱया महायुद्धास भारत पाक व भारत चीन युद्धांमध्ये लढलेल्या अनेकांची महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये नोंदी असून प्राधान्याने सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील माजी सैनिक मंडळाकडून शासनाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त होत आहे .

यासंदर्भात  शासनाच्या ग्रामविकास विभागाचे १८ऑगस्ट २०च्या आदेशानुसार  गेल्या अनेक वर्षा पासून असणारी आजी माजी सैनिकांची शासनाकडील आपल्या  मालमत्ता कराला सूट देण्याचे मागणीबाबत  निर्णय घेण्यात आला असूनसंबंधित संस्थांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असे सूचित करण्यात आले आहे .

ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या ३१ डिसेंबर २०१५च्या अधिसूचनेतील संदर्भाने ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला असून  ग्रामपंचायत अधिनियम १९५९ सालातील ३ कलम १२४ अंतर्गत तसेच १९६० मधील तरतुदीनुसार पंचायतीला करमाफी आकारण्याचा अधिकार देण्यात  आले अाहेत. त्यानुसार कर प्रणाली लागू करण्यात आली आहे सदर अधिसूचनेतील नियम ७ (४) (६) मधील तरतुदीनुसार संरक्षण दलातील सेवा पदधारक अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या अथवा अवलंबितांचा कोणत्याही एका इमारतीस मालमत्ता करातून सूट देण्याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला असून अशी सूट सेवेतील आजी माजी सैनिकांना द्यावी अशी गेल्या अनेक वर्षांची  मागणी मंजूर करण्यात आली आहे  . 

या संदर्भात १८ ऑगस्ट  २० रोजी ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार देशासाठी जिवाची परवा न करता निस्वार्थीपणे संरक्षण करणाऱ्याना योग्य व उचित सन्मान देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून संबंधित आजी माजी सैनिकांच्या अथवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असणाऱ्या एका इमारतिस मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या संदर्भात पात्र असलेल्या सर्व संबंधितांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्यांचे प्रमाणपत्र  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देणे बंधनकारक आहे असे या आदेशामध्ये सूचित करण्यात आले आहे .

आपल्या मातृभूमीसाठी जीवाची पर्वा न करता तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या या सैनिकांच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला  शासनाकडून अखेर मंजुरी मिळाल्याबद्दल महाड तालुक्यातील आजी माजी सैनिकांकडून शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे