Farooq Qazi, accused in Tariq Garden tragedy, remanded in judicial custody for 14 days
तारीक गार्डन दुर्घटनेतील आरोपी फारूक काझीला१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • संतप्त जमावाकडून आरोपीला घेराव, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

महाड : महाड (mahad) मधील तारीक गार्डन इमारत (Tariq Garden Building) दुर्घटनेतील (collapse) मुख्य आरोपी असलेल्या फारूक काझी (Farooq Qazi) याला आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (court custody) सुनावली. सात दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज काझी याला महाड न्यायालयातून (mahad court) अलिबाग (alibaug) येथे पोलीस गाडीतून नेत असताना न्यायालयाच्या आवारात जमलेल्या या दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी तसेच या इमारतीतील रहिवाशांनी काझी असलेली पोलीस गाडी अडवून या गाडीला घेराव घातला. आरोपी काझीला शिवीगाळ करीत याला आमच्या ताब्यात द्या,निष्पापांचे बळी घेणाऱ्याला फासावर लटकवा असा आक्रोश केला.

महाड न्यायालयाच्या आवारात यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्यात यश आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी डी वाय एस पी शशिकांत काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरिक्षक शैलेश सणस आणि पोलीस, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तारीक गार्डन इमारत दुर्घटनेतील फरार आरोपी असलेला बिल्डर फारूक काझी हा माणगाव न्यायालयात शरण आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते . त्यावेळी त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्याची आज मुदत संपल्यानंतर फारूक काझीला महाड न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी आणले होते. मात्र काझीला न्यायालयात आणणार असल्याचे समजल्यानंतर आज सकाळी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी आणि रहिवाशांनी शहर पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. फारूक काझी याला पोलीस बंदोबस्तात अलिबाग येथे रवाना करण्यात आले.

२४ ऑगस्ट रोजी महाड शहरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून सोळा रहिवाशांचे बळी गेले होते तर अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होऊन ही कुटुंबे बेघर झाली आहेत. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर फारूक काझीसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, यापैकी फारूक काझीसह, आरसीसी डिझायनर्स बाहुबली धामणे, युनुस रज्जाक शेख या तिघांना अटक केली असून ३ आरोपी अद्यापही फरार आहेत.