सर्वेक्षणाच्या कामासाठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेकडे भरावा लागेल ५०० रुपये दंड

पनवेल :पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांतील

पनवेल :पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

 कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करणे हे आवश्यक ठरते. यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक, कर्मचारी यांची नेमणूक केली होती. पनवेल मनपाचे सर्वच कर्मचारी मार्च २०२० पासून सतत काम करत आहेत. मात्र संसर्ग वाढल्याने व कर्मचारी कमी असल्याने शेवटी रायगड जिल्हा परिषदेचे कर्मचारी सर्वेक्षणकामी घेण्यात आले. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी दंड लावण्यात आला.  भविष्यात कोणी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.

मनपा हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचे एकूण शिक्षक ३२३ आहेत. यापैकी ५५ वर्षे वय व आजारपण व विविध कारणांमुळे २२१ शिक्षक आले नाहीत. त्यांच्या रजा खर्ची टाकण्यात येत आहेत. उर्वरित पैकी १०३  शिक्षक आले होते. तसेच ७६ शिक्षक गैरहजर राहिलेले आहेत. त्यांना आता ५०० रुपये प्रत्येकी दंड आकारण्यात येत आहे.त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

पनवेल  कार्यरत शिक्षक – १२ गैरहजर १२ , कळंबोलीत २६ कार्यरत शिक्षक आणि २० गैरहजर, नवीन पनवेलमध्ये ३४ कार्यरत शिक्षक आणि २०  गैरहजर,  खारघरमध्ये १८ कार्यरत शिक्षक आणि १४  गैरहजर,  कामोठेमध्ये १४  कार्यरत शिक्षक तर २ गैरहजर. यापुढे कोणी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांचेवर साथरोग अधिनियम १८९७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.