पनवेल महानगरपालिका हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क न लावता

 पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क न लावता फिरणार्‍यांना १०० रुपये दंड आणि कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना दंड आकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात कामोठे व खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण आजपर्यंत कमी प्रमाणात होते. मात्र आता दाट लोकवस्तीच्या भागातदेखील रुग्णांचा सापडत आहेत. लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे लोकांचा संचार वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका,असे आवाहन करूनदेखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. 
लहान मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एकापेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे. त्यातही काही बेजबाबदार नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी चारही प्रभागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल या चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करीत आहेत.