crocodile

मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारावर मगरीने हल्ला केल्याने(crocodile attack on fisherman) तो जखमी होण्याची घटना घडली आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील नांगलवाडी गावाच्या हद्दीत काळ नदी पात्रात हा प्रकार घडला आहे.

महाड : मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारावर मगरीने हल्ला केल्याने(crocodile attack on fisherman) तो जखमी होण्याची घटना घडली आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील नांगलवाडी गावाच्या हद्दीत काळ नदी पात्रात हा प्रकार घडला आहे.

injured fisherman
जखमी मच्छिमार

दिनकर महाडीक असे या जखमी मच्छिमाराचे नाव आहे. आज सकाळी पाच वाजता ते आपले सहकारी धोंडीराम महाडीक यांच्या बरोबर मासेमारीसाठी गेले होते. सहा वाजण्याच्या सुमारास ते पात्रात उतरले असता एका मगरीने अचानक त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून दिनकर महाडीक पात्राबाहेर पळाले. मात्र मगरीने पात्राबाहेर येवून पुन्हा त्यांच्या दुसऱ्या पायाला चावा घेतला. कशीबशी सुटका करून घेत दिनकर महाडीक आणि धोंडीराम महाडीक यांनी तेथून पलायन केले. मगरीने केलेल्या हल्ल्यात दिनकर महाडीक यांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील काळ नदी पात्रात २० ते २५ मगरींचा संचार आहे. याच भागात नांगलवाडी भोईवाडा येथील मच्छिमार मासेमारीसाठी येत असतात. लगतच गावाची स्मशानभूमी आहे. तेथे अंत्यसंस्कार आणि मरणोत्तर धार्मिक विधी केले जातात. मगरींच्या या वाढत्या संख्येमुळे मच्छिमार आणि नागरिकांना निर्माण झालेला धोका पाहता वन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.