वादळी हवामानामुळे श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा मासेमारी बंद

श्रीवर्धन: श्रीवर्धनमध्ये(shreewardhan) शनिवारी संध्याकाळनंतर हवामानात अचानक बदल झाला. जोरदार वाऱ्यासह(wind) मुसळधार पर्जन्यवृष्टीदेखील(rain) सुरू झाली. त्यामुळे शांत झालेला समुद्र खूप मोठ्या प्रमाणात पुन्हा खवळला. पंधरा दिवसांपुर्वी खूप मोठ्या प्रमाणात खवळलेला समुद्र बऱ्यापैकी शांत झाला होता. मच्छीमारांनी आपल्या होड्या मच्छिमारीसाठी समुद्रात ढकलल्या होत्या. वास्तविक पाहता ३१ जुलै रोजी शासकीय मासेमारीवरील बंदी उठविण्यात येते व त्यानंतर मच्छीमाराला सुरुवात होते. परंतु ३१ जुलैनंतर३ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असल्याने समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छीमारीला सुरुवात करूया या उद्देशाने सर्व मच्छीमार बांधवांनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी करण्यासाठी दिवस ठरवला
होता. परंतु नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले व समुद्र खूप मोठ्या प्रमाणात खवळला. पर्यायाने मच्छीमारीचा हंगाम जवळजवळ एक महिना लांबला गेला.

ऑगस्ट महिन्याच्या २६, २७ तारखेच्या दरम्यान समुद्र शांत झाल्याने मच्छीमारांनी आपल्या होड्या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी पाठवल्या. सुरुवातीलाच मच्छीमारी हंगाम चांगला मिळाल्याने मच्छीमार बांधवदेखील आनंदात होते. मासळीदेखील चांगल्या प्रमाणात मिळत होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा समुद्रामध्ये वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. समुद्र पूर्णपणे खवळला. मागील वर्षीदेखील वारंवार चक्रीवादळ येणार, अशा हवामान खात्याच्या अंदाजामुळे अनेक वेळा मच्छीमारांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता व या वर्षीदेखील खराब हवामानामुळे मच्छीमारांना आपला व्यवसाय अनेक वेळा बंद करावा लागला आहे. या वेळी तीच अवस्था मच्छीमारांची झाली आहे.