श्रीवर्धन तालुक्यात मच्छीमारीच्या हंगामाला सुरुवात, आवक चांगली असल्याने मच्छिमार आनंदित

मच्छिमारां मध्ये या पुढील हंगाम तरी चांगला जाईल यासाठी देवाला साकडे घालून व आपल्या नौकांमध्ये सत्यनारायणाच्या पूजा करून आपल्या नौका मच्छिमारीसाठी समुद्रात पाठवण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या हंगामात सोलटकोळंबी, पापलेट, ढोमा, मांदेली, बांगडे यासह इतर लहान मोठ्या मच्छीची आवक चांगल्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रीवर्धन : मागील दोन दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यात मच्छिमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. मच्छिमारीच्या पहिल्याच हंगामात चांगल्या प्रकारे मच्छीची आवक होत असल्याने मच्छीमार बांधव आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहेत. २०१९ हे वर्ष मच्छीमारीसाठी अत्यंत वाईट गेले होते. कारण या वर्षात देखील अनेक वेळा हवामान खात्याकडून चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता व कोणतेही वादळ न होताना मच्छीमारांना मच्छीमारी बंद ठेवावी लागली होती. सन २०२० हे वर्ष सुरू झाल्यापासूनच मच्छीमारीला कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणी येत होत्या.

फक्त डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने चांगल्याप्रकारे मच्छीमारी केल्यानंतर जगावरती कोरोना महामारीचे संकट आढळून आल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात कमी झाली. तसेच मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे श्रीवर्धन येथून मोठ्या शहरांमध्ये जाणारी मच्छी देखील बंद झाली. पर्यायाने मच्छीमारी करून सुद्धा मच्छीला योग्यप्रकारे मागणी मिळत नव्हती तसेच भाव देखील मिळत नव्हता.

त्यामुळे मच्छीमारांना आपली मासेमारी बंद ठेवावी लागली होती. एप्रिल व मे महिन्यात मच्छिमारी सुरू असली तरी मच्छीला मागणी नसल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणातच मच्छिमारी केली जात होती. त्यानंतर तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन, हरिहरेश्वर या परिसरात धडकेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता व त्या वेळेपासून मच्छीमारी बंद होती. शासकीय आदेशाप्रमाणे एक जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात मासेमारीला बंदी असते. त्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छिमारी सुरू होईल असा मच्छीमारांचा अंदाज होता.

परंतु नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हवामानामध्ये अचानक बदल होऊन समुद्र खवळला व जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने मच्छीमारीचा हंगाम लांबला होता. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून समुद्र पूर्णपणे शांत झाला असल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये ढकललेल्या पाहायला मिळतात.

नौका मच्छीमारीसाठी जाऊ लागल्यानंतर पहिल्या दोन ते तीन दिवसात चांगल्या प्रकारे मच्छीची आवक झालेली असल्याने, मच्छिमारां मध्ये या पुढील हंगाम तरी चांगला जाईल यासाठी देवाला साकडे घालून व आपल्या नौकांमध्ये सत्यनारायणाच्या पूजा करून आपल्या नौका मच्छिमारीसाठी समुद्रात पाठवण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या हंगामात सोलटकोळंबी, पापलेट, ढोमा, मांदेली, बांगडे यासह इतर लहान मोठ्या मच्छीची आवक चांगल्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारामध्ये सर्व प्रकारची मच्छी चांगली व ताजी मिळत असल्याने खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.