Forebod snake smugglers attack Alibag forest workers; Two employees seriously injured

    अलिबाग : मांडूळ साप विक्रीसाठी आलेल्या लोकांना पकडण्यासाठी गेलेल्या अलिबाग वन कर्मचार्‍यांवर कोयत्यासह लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पोयनाड हद्दीत घडला आहे. या हल्ल्यात दोन वन कर्मचारी जखमी झाले असून, याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    पोयनाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी काहीजण पोयनाड हद्दीतील बसनी आदिवासी वाडी परिसरात मांडूळ जातीचा साप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अलिबागचे वनक्षेत्रपाल विकास श्रीधर तरसे यांना मिळाली होती. याबाबत वरिष्ठांना कळविल्यानंतर त्यांच्या आदेशाने वनक्षेत्रपाल विकास श्रीधर तरसे, वनपाल माने, वनरक्षक शेख, सचिन ठाकूर, वनरक्षक तायडे, वनरक्षक अलगी व दोन पंच असे पथक दुपारी साडे चारच्या सुमारास कारवाईसाठी बसनी आदिवासी वाडी येथील नदी किनार्‍यावर पोहोचले.

    सायंकाळच्या सुमारास काहीजण तेथे मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. मांडूळ साप गोल चौकोनी आकाराच्या बरणीमध्ये आणला असल्याची खात्री झाल्याने वन कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर झडप घातली. सापासह त्यांना ताब्यात घेत असतानाच त्यांच्या सहकार्‍यांनी वन कर्मचार्‍यांवर कोयता, लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला.

    एकाने वनक्षेत्रपाल तरसे यांच्या डोक्यामध्ये कोयता मारला व इतरांना बांबूच्या काठीने मारहाण करीत ते पळून गेले. या हल्ल्यात वनक्षेत्रपाल विकास तरसे व अन्य एकजण याला गंभीर दुखापत झाली, तर इतरांना किरकोळ दुखापती झाल्याने उपचारासाठी वन कर्मचार्‍यांना अलिबाग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    या प्रकरणी वनक्षेत्रपाल विकास तरसे यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पांडुरंग नाईक, कृष्णा नाईक (दोघे रा. बसनी आदिवासी वाडी, ता.अलिबाग), हशा ठाकूर, सुनील ठाकूर, अनिल ठाकूर व सुरेश ठाकूर (चौघे रा. वाघोडे ठाकूर वाडी, पोयनाड, ता.अलिबाग) या सहा जणांवर वन कर्मचार्‍यांना मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२  चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोयनाड पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे करीत आहेत.