पनवेल शहर पोलिसांनी केला परप्रांतीयांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पनवेल : परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी शासनातर्फे रेल्वेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा लोकांची फसवणूक करणार्‍या एका

पनवेल : परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी शासनातर्फे रेल्वेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशा लोकांची फसवणूक करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश पनवेल शहर पोलिसांनी केला आहे.

 पनवेलहून बिहार राज्यात जाणार्‍या विशेष रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवासी शिट मिळवून देण्याकरिता २३ परप्रांतीय नागरिकांकडून काही व्यक्ती पैसे स्वीकारत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार, पो.उप.नि.किशोरकुमार नेवसे, पो.ना.महेश पाटील, पो.शि.परमेश्‍वर नागरगोजे आदींच्या विशेष पथकाने पनवेल परिसरात छापा टाकून आरोपी हसन याकूब सय्यद, राघवेंद्र रामेश्‍वर गुप्ता व इरफान इब्राहीम माहिगीर यांना अटक करण्यात आली  त्यांच्याकडून भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध भा.दं.वी. कलम ४२०, ३३६, २६९, २७०, १८८ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), १३५ सह साथरोग प्रति अधि.१८९७ चे कलम २, ३, ४ सह महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम २०२० चे कलम ११ सह आपत्ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ (ब) प्रमाणे कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

प्रवासी मजूरांनी आपल्या नावाची नोंदणी ते राहत असलेल्या भागातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोलीस ठाणे येथे अथवा कोव्हीड१९ .महापोलिस.इन (www.covid19.mhpolice.in) या लिंकवर ऑनलाईन करावी. प्रवासी मजूरांना ते राहत असलेल्या भागातून पोलीस, महसूल कर्मचारी बसने रेल्वे स्टेशन येथे घेवून येतात. रेल्वे स्टेशन पर्यंत बस प्रवास, रेल्वे प्रवास थर्मल स्कॅनिंग, जेवण व पाण्याची सोय शासनातर्फे मोफत केली जात आहे. प्रवासी मजूरांनी नोंदणीसाठी कोणत्याही खाजगी इसमांकडे जावू नये तसेच स्वतः अथवा इतर इसमांच्या मार्फत पनवेल रेल्वे स्थानक येथे प्रवासाकरिता येवू नये, असे आवाहन  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.