हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गणेशोत्सव !

महाड : सर्वधर्मसमभाव असं म्हटलं जातं पण ते खऱ्या अर्थाने दिसून येत नाही. मात्र, म्हाप्रळ नवतरुण मंडळ गणेशोत्सव म्हटल्यावर हे चित्र प्रकर्षाने दिसून येते. गेली तीन दशकापासून कार्यरत असणारे मंडळ म्हाप्रळ पंचक्रोशी मधील एकमेव सामाजिक गणेशोत्सव मंडळ आहे.सर्व समाजातील लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. या मंडळाचे दहा वर्षे अध्यक्षपद मुस्लिम समाजातील व्यक्तीकडे होते अध्यक्षपदाला योग्य न्याय देत त्यांनी कारभार उत्तम प्रकारे सांभाळून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

गणेशोत्सवाच्या विविध उपक्रमांत मुस्लिम बांधव उत्साहाने सहभागी होत आहेतच पण या उत्सवाचा एक सकारात्मक भाग ते आपल्या योगदानाने बनतांना दिसत आहेत. गणेशोत्सव एकत्रित रीत्या साजरा करण्याचा एक नवा विचार समाजाला दिला आहे “मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना” ओळीप्रमाणे धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणूसपण जपण्याच्या उद्देशाने समाजात रुजवला आहे.

दरवर्षी मंडळाकडून अनंत चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा होत असे परंतु जागतिक महामारी समजला जाणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट कोसळले आहे. आपल्या राज्याला ही या आर्थिक संकटाचा फटका बसला आहे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्याचाच एक भाग म्हणून कोरोना विरुद्ध लढाईत आपला हातभार लागावा या उद्देशाने मंडळाने यावर्षी दीड दिवस गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करून दरवर्षी होणारा खर्च टाळून उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे.