गायमुख पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार – खासदार तटकरे

मुरुड जंजिरा: मुरुड(murud) शहराजवळचे भगवान शंकराचे स्थान असलेले गायमुख(gaymukh) क्षेत्र विकसित करणार असून या ठिकाणी अगदी सहज जाता यावे यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता(cement concrete road) करणार आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या ठिकाणी असणाऱ्या खडकांवर काँक्रीट भिंत बांधून येणाऱ्या पर्यटकांना सूर्यास्ताचे दर्शन आदींचा भागाचा विकासाचे काम त्वरित करणार असून लवकरच मंत्रालयात याबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा करून या कामाला मूर्त स्वरूप देण्याचा विचार रायगडचे खासदार सुनील तटकरे(mp sunil tatkare) यांनी व्यक्त केला.
मुरुड दौऱ्यावर आले असताना त्यांनी नुकतीच खोरा बंदराला भेट दिली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अतिक खतीब यांनी या ठिकाणाबाबत माहिती देऊन या भागाचा विकास करण्याची विनंती केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले. यावेळी सुनील तटकरे यांनी खोरा बंदरातील तीनशे मीटरचा रस्ता सुद्धा अद्यावत बनवण्याबाबत बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांच्याकडून माहिती घेतली त्याच प्रमाणे खोरा बंदरातील रस्त्यावरील असणाऱ्या डोंगरातील दगडे रस्त्यावर पडू नये यासाठी डोंगराला सिमेंट कॉंक्रिटची भिंत बांधण्याबाबतचे काम सुद्धा पुढील काळात जलद गतीने सुरु होईल, याबाबत अधिकारी वर्गाला योग्य सूचना देणार असल्याचे सांगितले.
याबाबत तटकरे पुढे म्हणाले की, हा विकास होण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डातील अधिकारी वर्ग व मत्स्य विभागातील अधिकारी यांची संयुक्तिक सभा लवकरच घेणार असून या कामाची सुरुवात लवकरात लवकर करणार असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी यावेळी केले.
अतिक खतीब यांनी या भागाचा विकास झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याच प्रमाणे हौशी मासे पकडणाऱ्या लोकांना एक सुरक्षित जागा प्राप्त होऊन त्यांची सुद्धा रेलचेल वाढणार असल्याचे सांगितले.खासदार सुनील तटकरे हेच मुरुड तालुक्याचा विकास करू शकतात कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, असे म्हटले.
यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक संजय गुंजाळ ,माजी सभापती स्मिता खेडेकर मुरुड शहर अध्यक्ष विजय भोय आदी मान्यवर उपस्थित होते.