सर्प, विंचू व श्वान दंशावर सरकारी रुग्णालयात तात्काळ उपचार मिळावा –  प्रितम म्हात्रे

  • रायगड जिल्हा हा डोंगरदऱ्या व कडेकपारीचा परिसर असल्याने याठिकाणी हिंस्त्र पशु व विषारी प्राणी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रायगड जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे डोंगरकपारीत मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत. पावसाळ्यात अशा विषारी प्राण्यांचा उपद्रव वाढत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

पनवेल :  पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प, विंचू यांचे प्रमाण वाढत असते. त्यांचा दंश झाल्याने लवकरात लवकर उपचार मिळयला हवेत. त्यामुळे  सर्प, विंचू व श्वान दंशावर सरकारी रुग्णालयात तात्काळ उपचार मिळण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे. 

रायगड जिल्हा हा डोंगरदऱ्या व कडेकपारीचा परिसर असल्याने याठिकाणी हिंस्त्र पशु व विषारी प्राणी यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रायगड जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे डोंगरकपारीत मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत. पावसाळ्यात अशा विषारी प्राण्यांचा उपद्रव वाढत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाच्या तसेच मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वारंवार घडतात. या घटनेत उपचाराअभावी अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. 

त्यामुळे असे प्रकार घडू नये यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे. सध्या कोविडने थैमान घातल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. तरीही सर्प, विंचवाने दंश केलेल्या तसेच कुत्रा चावलेल्या रुग्णावर स्थानिक पातळीवर उपचार होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने .जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रावर बारमाही औषधे उपलब्ध असावी, रुग्णावर तात्काळ उपचार झाले पाहिजे यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड यांच्याकडे केली आहे.