किल्ले रायगडवरील उत्खननात आढळली सोन्याची बांगडी; पुरातत्व विभागाच्या हाती महत्त्वाचा दस्ताऐवज

उत्खननादरम्यान सापडलेला हा आजवरचा सर्वात मोठा दागिना असून, त्यामुळे शिवकालीन सौंदर्य प्रसाधनांवर आणि एकूणच शिवकालीन संस्कृतीवर प्रकाश पडेल, असा विश्वासही खासदर संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

    महाड : भारतीय पुरातत्व विभागातर्फे किल्ले रायगडवर करण्यात येत असलेल्या उत्खननामध्ये ३० मार्च रोजी एक सोन्याची बांगडी सापडली असल्याची माहिती, रायगड विकास प्रधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

    उत्खननादरम्यान सापडलेला हा आजवरचा सर्वात मोठा दागिना असून, त्यामुळे शिवकालीन सौंदर्य प्रसाधनांवर आणि एकूणच शिवकालीन संस्कृतीवर प्रकाश पडेल, असा विश्वासही खासदर संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

    पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या उत्खननामध्ये आजवर अनेक वस्तू सापडल्या आहेत. दैनंदिन वापराच्या आहेत. त्यात एक सोन्याच्या कर्णभूषणाचाही समावेश आहे. सध्या जगदिश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननामध्ये ही नाजूक कलाकुसर असलेली सोन्याची बांगडी आढळली आहे. ही बांगडी कोणत्या काळातील असावी हे संशोधनाअंती स्पष्ट होईलच, मात्र ही शिवकाळातीलच बांगडी असावी असा ठाम विश्वास खा. संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.