गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

सुतारवाडी: पावसाळी गुरांच्या खाण्याच्या चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी भर उन्हामध्ये शेतकऱ्यांना बैलगाडीने वणवण फिरून पेंडा गोळा करावा लागतो. सध्या मे महिना सुरू झाला सकाळी दहा वाजल्यापासून

 सुतारवाडी: पावसाळी गुरांच्या खाण्याच्या चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी भर उन्हामध्ये शेतकऱ्यांना बैलगाडीने वणवण फिरून पेंडा गोळा करावा लागतो. सध्या मे महिना सुरू झाला सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिकच चढत आहे. उन्हातून प्रवास करणार्‍या नागरिकांना विशेष करून बैलगाडीने गुरांची वैरण आणणाऱ्यांना खूपच त्रास होत आहे. पेंढ्याची एक गुंडी रुपये पाचला उपलब्ध असून ५०० रुपये शेकडा दराने त्याची विक्री होत आहे. सुतारवाडी, जामगाव, कुडली, आंबिवली, पाथरशेत, धगडवाडी, सावरवाडी, गौळवाडी कामत,  दूरटोली, जाधववाडी, ढोकळेवाडी या विभागांमध्ये पावसाच्या पाण्यावर भातशेती केली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाळी गुरांच्या वैरणीचा मोठा प्रश्न असतो. वरसगाव, खांब, मुठवली, पुगाव या विभागात उन्हाळी भात पीक कालव्याच्या पाण्यावर घेतले जाते. तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर भातपीक घेतात. त्यामुळे अशा परिसरामध्ये मुबलक प्रमाणावर भाताच्या पेंढ्या उपलब्ध असतात. या परिसरात जावून दूरटोली, कुडली,  आंबिवली तसेच अन्य गावातील शेतकरी पावसाळी गुरांची वैरण आणतात. सुमारे १० ते १५ किमी अंतरावर जावून बैलगाडीच्या सहाय्याने पेंढ्याची वाहतूक केली जाते. लॉकडाऊन काळामध्ये पेंढा वाहतुकीसाठी टेम्पो मिळत नसल्यामुळे आम्ही बैलगाडीमध्ये जेवढा पेंढा आणता येईल तेवढा आणतो, असे येथील शेतकरी आनंद शिंदे यांनी सांगितले.